पीटीआय, लखनौ : ‘भाजपकडून प्रत्येक मशिदीत मंदिर असल्याचा दावा होऊ लागला तर जनता प्रत्येक मंदिरात बौद्ध विहार शोधू लागतील,’ असा इशारा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामीप्रसाद मौर्य यांनी येथे दिला. वाराणसी आणि मथुरा येथील मशीद-मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला. मौर्य यांनी दावा केला, की उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर, पुरीतील जगन्नाथ मंदिर, केरळमधील अय्यप्पा मंदिर आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठोबा मंदिर हे बौद्ध विहार होते. हे बौद्ध विहार पाडण्यात आले आणि नंतर तेथे हिंदू धार्मिक तीर्थस्थाने उभारण्यात आली.
आठव्या शतकापर्यंत तेथे बौद्ध विहार होते. तसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. या मंदिरांच्या जागी पुन्हा बौद्ध विहार उभारावेत या हेतूने मी हे सांगत नसून, तुम्ही प्रत्येक मशिदीच्या जागी पूर्वी मंदिर असल्याचा दावा केल्यास सर्व मंदिरांच्या जागी बौद्ध विहार होते अथवा नाही, याची शहानिशा का करू नये? मंदिर-मशिदीचा वाद निर्माण करण्याचा भाजपच्या मंडळींचा राजकीय डाव आहे. त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल. मौर्य यांनी शुक्रवारीही असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मौर्य यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगून, धामी म्हणाले होते, की यामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या देशविरोधी आणि धर्मविरोधी विचारसरणी प्रतिबिंबित होत आहे.
अखिलेश यादव सहमत आहेत का, भाजपचा प्रश्न
उत्तरप्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंग चौधरी यांनी ‘ट्वीट’द्वारे सांगितले, की सनातन धर्माचा वारंवार अपमान करणे ही समाजवादी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची सवय झाली आहे. मौर्य यांनी वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे सांगून ते म्हणाले, की समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी या विषयावर आपले मत मांडावे आणि समाजवादी पक्ष या वक्तव्यांशी सहमत आहे का ते स्पष्ट करावे.