ब्रेग्झिट समझोत्यावरून अडचणीत आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे त्यांना किमान वर्षभर दिलासा मिळाला आहे. हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्याविरोधामध्ये अविश्वासाचा ठराव मांडला होता. पुढील सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये होणार असून त्या वेळी आपण पक्षाचे नेतृत्व करणार नाही असे मान्य करून थेरेसा मे यांनी बंडखोर लोकप्रतिनिधींना शांत केले.
ब्रेग्झिट करारावरून मांडण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी थेरेसा मे यांना पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते मिळणे आवश्यक होते. गुप्त मतदानात हुजूर पक्षाच्या ३१७ मतांपैकी २०० मते मे यांच्या बाजूने पडली तर ११७ मते त्यांच्या विरोधात गेली. टक्केवारीत सांगायचे तर मे यांना स्वपक्षीय ६३ टक्के खासदारांचा पाठिंबा आहे.
या ठरावावरील चर्चेच्या सुरुवातीला मे म्हणाल्या की, ‘‘ब्रेग्झिटची प्रक्रिया योग्य रित्या मार्गी लागलेली पाहूनच मी पायउतार व्हायचा निर्णय घेतला आहे.’’ त्यामुळे त्या आता २०२२ची निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.
मे यांनी विजयानंतरच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘मला पाठिंबा देणाऱ्यांची मी ऋणी आहे, मात्र लक्षणीय संख्येने माझ्या विरोधातही माझ्या सहकाऱ्यांनी मते दिली आहेत. त्यांची बाजूही मी ऐकून घेतली आहे. आता आम्हा सर्वाना ब्रेग्झिटनंतरच्या ब्रिटनच्या नवउभारणीकडे वळले पाहिजे.’’ अविश्वास ठरावातील विजय थेरेसा मे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. त्यांचा पराभव झाला असता तर पुन्हा निवडणुका आणि नवा पंतप्रधान येण्याची शक्यता होती.