करोनाचं संकट दूर करण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र देखील बंद आहेत. अशात केंद्र सरकारने लस वाया घालवत असलेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत झारखंड आणि छत्तीसगड ही दोन राज्य आघाडीवर आहेत. झारखंड राज्याने पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लशींच्या ३७.३ टक्के लशी वाया घालवल्या आहेत. तर छत्तीसगडमध्ये एकूण लशींच्या ३०.२ टक्के लशी वाया गेल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लशी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लशी वाया गेल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट केलं आहे. “लशींची नासाडी होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. पण आकडेवारीत वाया घालवण्याचं प्रमाण चुकीचं आहे. आतापर्यंत एकूण लशींच्या ४.६५ टक्के लशी वाया गेल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे कोविन पोर्टलवर योग्य डाटा पोहोचू शकला नाही”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिलं आहे.

आतापर्यंत देशात एकूण २०.०६ कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यात १५.७१ कोटी लोकांना लसीचा पहिला डोस तर ४.३५ कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. देशात गेल्या २४ तासात २०.३६ लाख लोकांना लस दिली गेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These indian state are wasting vaccine dose central health discole data rmt