अदाणी प्रकरणावर शरद पवारांनी घेतलेली भूमिका चर्चेत आहे. अशात अदाणी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही. कारण संसदीय समिती निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सत्ताधारी पक्षाचे असतात. उदाहरणार्थ २१ लोकांची समिती तयार करण्यात आली तर त्यात १५ लोक सत्ताधारी पक्षाचे असतात. असं असताना सत्य कसं बाहेर येईल असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तसंच देशात अदाणी यांच्या प्रश्नापेक्षा तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?
मला असं वाटतं की आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या. हे तीन प्रश्न देशासमोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. अदाणींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं असं वाटतं आहे. हिंडेनबर्ग हे नावही मी कधी ऐकलेलं नाही. अशात अदाणी यांच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे मुद्दे देशात आहेत. ते सोडवण्यावर विरोधकांनी भर दिला पाहिजे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे असं वाटतं आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की येऊ देत निर्णय तसा आम्ही वाट बघतोय. तसा निर्णय आला तर योग्य भूमिका घेऊ. एवढंच नाही तर वीर सावरकर यांच्या मुद्द्यावर आमची मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. एखाद्या प्रश्नावरून मतभेद असू शकतात त्यावर चर्चा करता येते त्यातून प्रश्न मार्गी लागतात असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
एक काळ असा होता की त्या काळात सत्ताधारी पक्षावर टीका करायची असेल तर आम्ही टाटा बिर्लांचं नाव घेत असू. पण आता ही नावं घेतली जात नाहीत. कारण आता देशालाही समजलं आहे की टाटा आणि बिर्लांचं देशासाठी काय योगदान आहे. त्याचप्रमाणे अंबानी आणि अदाणी यांचंही देशासाठी योगदान आहे हे विसरता येणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.