Yazidi Women Fawzia Amin Sido rescued from gaza: इस्रायलने हमासचा खात्मा करण्यासाठी वर्षभराहून अधिक काळापासून गाझापट्टीवर हल्ले केले आहेत. नुकतेच इस्रायलच्या सैन्याने गाझामधून याझिदी समुदायाच्या फौझिया अमीन सिडो या मुलीची सुटका केली होती. सुटकेच्या दोन आठवड्यानंतर आता या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे. अवघ्या दहा वर्षांची असताना सिडो आणि तिच्या भावाचे अपहरण करण्यात आले होते. तीन दिवस उपाशीपोटी पायपीट केल्यानंतर अपहरण केलेल्या जमावाला इसिसच्या अतिरेक्यांनी खायला अन्न दिलं. यामध्ये भात आणि मांसाचा समावेश होता. हे मांस याझिदी समुदायाच्या मुलांचं होतं, हे नंतर सर्वांना उमगलं.

फौझिया सिडोनं जेरुसलेम पोस्टशी बोलताना तिच्याबरोबर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. ती म्हणाली, त्यांनी आम्हाला भात आणि मांस खायला दिलं होतं. पण त्याची विचित्र वाटत होती. आमच्यातील काही जणांना नंतर पोटदुखी सुरू झाली तर काहींनी उलट्या केल्या. जेव्हा आमचं जेवून झालं, तेव्हा अतिरेक्यांनीच सांगितलं की ते मांस याझिदी समुदायातील मुलाचं होतं. त्यांनी आम्हाला शिरच्छेद केलेल्या मुलांचे फोटोही दाखवले आणि सांगितलं की, या मुलांना तुम्ही आताच खाल्लं.

फौझिया सिडो पुढं म्हणाली की, हे ऐकून आमच्यातल्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि ती तिथेच मरण पावली. तसेच एका महिलेने त्या फोटोंमधून स्वतःच्या मुलाला ओळखलं आणि हंबरडा फोडला. इसिसच्या अतिरेक्यांनी आमच्यावर खूप दबाव टाकला होता. त्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं. आमच्या हाती काहीच नव्हतं.

हे वाचा >> ‘ISIS’ने अपहरण केलेल्या याझिदी महिलेची ‘गाझा’मधून तीन देशांनी कशी केली १० वर्षांनंतर सुटका?

२०१४ साली इस्लामिक स्टेट अर्थात इसिसनं इराकमधील आणि सीरियामधील याझिदींविरुद्ध क्रूर मोहीम सुरू केली. अनेक मुली आणि महिलांना त्यांनी गुलाम बनवलं. प्राचीन यझिदी समुदाय अल्पसंख्याक असून इसिसने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले.

फौझिया सिडो आता २१ वर्षांची झाली आहे. दहा वर्षांची असताना जेव्हा तिचे अपहरण झाले त्यानंतर तिला नऊ महिने जमिनीखाली असलेल्या कारागृहात कोंडून ठेवण्यात आलं होतं. तिच्याबरोबर आणखी २०० याझिदी महिला आणि मुलं होती. काही मुलं पाण्याच्या कमतरतेमुळं तिथेच मरण पावली. सिडोला आतापर्यंत अनेकदा जिहादी अतिरेक्यांना विकण्यात आलं. त्यापैकीच एक अबू अमर अल-मकदीसी आहे, ज्याच्यापासून सिडोला दोन मुलं झाली. ११ वर्ष कैदेत राहिल्यानंतर इस्रायल, अमेरिका आणि इराक यांचा समावेश असलेल्या संयुक्त मोहिमेद्वारे सिडोची सुटका करण्यात आली. आता ती इराकमध्ये तिच्या कुटुंबियांबरोबर आहे.

सिडोची दोन्ही मुले मात्र गाझामध्येच आहेत. तिथे अपहरणकर्त्यांनी त्यांना ताब्यात ठेवले आहे. त्यांना ते अरब मुस्लीम म्हणून वाढविणार आहेत. सिडोनं सांगितलं की, मला गाझामधील ‘सबाया’मध्ये ठेवण्यात आलं होतं. हा एक अरेबिक शब्द आहे. जिथे तरूण मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं.