पीटीआय, पुणे : आपल्या सैनिकांचे रक्षण करता येत नसेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर तोफ डागली. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या दाव्याच्या संदर्भात पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
येथील पुरंदर तालुक्यात एका शेतकरी मेळाव्याला पवारांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘देशात अनेक घटना घडत असल्या तरी त्यातील काही उजेडात येत नाहीत. पुलवामा भागात ४० सैनिक मारले गेले. भाजपनेच नेमलेले माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलिकडेच याबाबत नवी माहिती समोर आणली. त्यावेळी जवानांना योग्य साधनसामुद्री आणि विमाने न पुरविण्यात आल्यामुळे त्यांना आपला जीव गमावावा लागला. मलिक यांनी देशतील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला याबाबत माहिती दिली, तेव्हा त्यांना याबाबत बोलू नका असे सांगण्यात आले.’’
जवानांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असते. सरकार जर विपरित भूमिका घेत असेल, तर त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्यासाठी केवळ येऊ घातलेल्या निवडणुकाच महत्त्वाच्या असतात.