तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरीचा आरोप लावून भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर संसदेच्या नीतिमत्ता समितीने महुआ मोईत्रा आणि इतरांची चौकशी केली. आज शुक्रवार रोजी (दि. ८ डिसेंबर) समितीचा अहवाल लोकसभेत मांडला गेला. त्यानिमित्त महुआ यांची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, “माँ दुर्गा आता आली आहे, पुढे काय होते पाहू…” एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महुआ यांनी हे वक्तव्य केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी संसदेत आल्या असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महुआ मोईत्रा यांनी बंगालचे प्रसिद्ध कवी काझी नझरूल इस्लाम यांची एक बंगाली कविता यावेळी उद्धृत केली. त्या म्हणाल्या, “जेव्हा मनुष्य नाश होण्याच्या वाटेवर असतो, तेव्हा सर्वात आधी त्याचा विवेक मरतो. त्यांनी (भाजपा) वस्त्रहरण करण्यास सुरुवात केली, आता पुढे तुम्ही महाभारताचे युद्ध पाहाल.”

‘अहवालाचा अभ्यास करण्यासाठी ४८ तास द्या’

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी लाच घेतल्याच्या कथित आरोपाची चौकशी करणाऱ्या नीतिमत्ता आयोगाने मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर करण्यात आला असून आज लोकसभेच्या पटलावर मांडला गेला. अहवाल मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी ४८ तासांचा वेळ मागून घेतला आहे.

विरोधी पक्षातील खासदारांनी या अहवालाची प्रत मिळावी, यासाठी गोंधळ घातल्यानंतर लोकसभा तहकूब करण्यात आली. आता दुपारी २ वाजता या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे.

हे वाचा >> गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश; महुआ मोईत्रा कोण आहेत?

नीतिमत्ता समितीची ९ नोव्हेंबर रोजी बैठक झाली. समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखाली कॅश फॉर क्वेरी प्रकरणाची चौकशी झाली आणि या समितीने मोईत्रा यांची हकालपट्टी करण्याचा अहवाल स्वीकारला होता.

नीतिमत्ता आयोगातील सहा सदस्यांनी मोईत्रांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली असून चार विरोधी पक्ष सदस्यांनी विरोध केला आहे. त्यांनी अहवालाला आक्षेपपत्रही जोडले आहे. हा अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मांडला जाणार होता. लोकसभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरही हा विषय सूचिबद्ध होऊनही मांडला गेला नव्हता. समितीचे सदस्य व ‘बसप’चे खासदार दानिश अली यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे अहवाल लोकसभेत मांडणे लांबणीवर पडल्याचे सांगितले जात होते.

विशेष म्हणजे या समितीमध्ये सहा सदस्य आहेत. ज्यामध्ये काँग्रेसच्या निलंबित खासदार प्रणीत कौरदेखील आहेत. त्यांनीही या अहवालाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आणखी वाचा >> महुआ मोईत्रा यांच्या बडतर्फीची शिफारस; संसदेच्या नैतिकता समितीचा अहवाल, लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाची प्रतीक्षा

प्रकरण काय आहे?

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी, अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न लोकसभेत विचारण्यासाठी हिरानंदानी यांच्याकडून पैसे व किमती भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात मोईत्रा यांचे तत्कालीन घनिष्ठ मित्र व सर्वोच्च न्यायालयातील वकील जय आनंद देहदराई यांनी पुरावे दिल्याचा दावा दुबे यांनी केला होता. मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिले जाणारा लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप दुबेंनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून केला होता. या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपविले होते.