मणिपूरमध्ये दोन महिलांचे कपडे काढून त्यांची विविस्त्र धिंड काढल्याची घटना घडली आहे. तसंच एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचंही वृत्त आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. दुसरीकडे विरोधकांनी मात्र मणिपूरच्या या घटनेवरुन कडाडून टीका केली आहे. अशात ज्या दोन महिलांची धिंड काढण्यात आली त्या पीडितेच्या आईने आपल्यावर काय प्रसंग आला होता ते सांगितलं आहे.
सरकारने पुरेसे उपाय योजले नाहीत
या घटनेतील पीडितेची आई प्रचंड मानसिक धक्क्यातून अद्याप सावरलेली नाही. त्यांनी हा आरोप केला आहे की मणिपूर सरकारने हिंसाचार, दंगल रोखण्यासाठी सुरक्षेचे पुरेसे उपाय योजले नाहीत. NDTV ला दिलेल्या मुलाखतीत आपल्यावर काय प्रसंग आला? काय काय घडलं ते सगळं पीडितेच्या आईने सांगितलं आहे.
हे पण वाचा- “इतिहासात गाडलेली मढी उकरुन ज्यांचा धर्म…”, मणिपूर व्हायरल व्हिडीओवरुन जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान मोदींवर टीका
पीडितेच्या आईने काय सांगितलं?
“जमावाने त्या दिवशी (४ मे, २०२३) माझं घर पेटवून दिलं. त्यानंतर माझे पती आणि माझा मुलगा या दोघांचीही हत्या केली. त्यानंतर माझ्या मुलीला घेऊन गेले. तिचे कपडे काढून तिला नग्न केलं. तिची रस्त्यावरुन धिंड काढली गेली. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.”
“माझा छोटा मुलगा मी या घटनेत गमावला आहे. मी त्याच्यासाठी स्वप्न पाहात होते. तो १२ वीपर्यंत शिकला की काही तरी काम करेल अशी मला अपेक्षा होती. मात्र जमावाने माझ्या छोट्या मुलाला आणि माझ्या पतीला ठार केलं. माझा मोठा मुलगा आहे मात्र त्याची नोकरी गेली. आता माझ्याकडे कुठलीही आशा उरलेली नाही. मी निराश झाले आणि मनातून कोलमडून गेले आहे. आता मी माझ्या गावी परतेन असंही मला वाटत नाही.”
हे पण वाचा- “सुन्न व्हायला होतं!” मणिपूर घटनेवर हेमांगी कवीची पोस्ट; म्हणाली, “सोशल मीडियावर बोलून उपयोग नाही, पण…”
जमावाने आमचं घर पेटवलं, आमच्या शेताची नासधूस केली. माझं सगळं गाव जमावाने जाळलं आहे. आता मी त्या गावात परत जाऊन काय करणार? देवाच्या दयेनेच मी या सगळ्यातून कशीबशी वाचले. मात्र माझ्या मनावर कायमचा आघात झाला आहे. कारण त्या जमावाने माझ्या पतीची आणि मुलाची हत्या केली तसंच माझ्या मुलीची नग्न धिंड काढली. माझ्या मनात हा विचारही येतो की इतकं क्रूरपणे माणसं कशी काय वागू शकतात? असंही पीडितेच्या आईने म्हटलं आहे आणि ४ मे २०२३ ला घडलेला तो प्रसंग सांगितला आहे.