Terrorist Attack In Kashmir: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे आज दुपारी दहशतवादी हल्ल्यात किमान २० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर अनेक पर्यटक दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. बैसरन पर्वत रांगेतील प्रसिद्ध असे मिनी स्वित्झर्लंड हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. बेस कॅम्पवरून घोडा किंवा पायी ट्रेक करत अनेक पर्यटक येथे येत असतात.
दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर अनेकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या, असा दावा प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पर्यटक आणि त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक सैरावैरा पळताना दिसत आहेत.
एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ती तिच्या नवऱ्याला धर्म विचारल्यानंतर गोळी झाडल्याचे सांगते. माझ्या नवऱ्याला वाचवा, असे आर्जव ती स्थानिक लोकांना सांगत आहे. तर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आल्याचेही दिसत आहे.
गोळीबार झाल्यानंतर अनेक जखमी पर्यटक अनेक ठिकाणी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून येत आहेत. कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथील अनेक पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितलं जातं आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. हल्ला करणारे दहशतवादी हे रानटी आहेत. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, असेही ते म्हणाले. जखमींना उपचार देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला.