Bengaluru Crime : गेल्या दोन दशकांपासून देशभरात असंख्य चोऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातील एका ३७ वर्षीय कुख्यात चोराला बंगळुरू पोलिसांनी काल (मंगळवारी) अटक केली आहे. बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी याबाबत माहिती दिली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव पंचक्षरी एस. स्वामी असे आहे, तो महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी आहे. ९ जानेवारी रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील मारुती नगर येथील एका घरात १४ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरी झाली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केल्यानंतर पोलिसांनी स्वामीला अटक केली आणि त्याच्याकडून १८१ ग्रॅम सोन्याचे बिस्किट, ३३ ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक बंदुक जप्त केली.
अल्पवयीन असतानाच सुरू केल्या घरफोड्या
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वामीने २००३ मध्ये, अल्पवयीन असतानाच घरफोड्या करण्यास सुरुवात केली होती. २००९ पर्यंत तो एक अट्टल चोर बनला होता आणि यातून त्याने कोट्यवधींची संपत्ती जमवली होती. २०१४-१५ मध्ये, त्याचे एका अभिनेत्रीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिच्यावर खूप खर्च केला, तिच्यासाठी कोलकातामध्ये ३ कोटी रुपयांचे घर बांधले तसेच तिला २२ लाख रुपयांचे मत्स्यालयही भेट दिले होते.
यापूर्वी गुजरात, महाराष्ट्रात कारवाई
२०१६ मध्ये, गुजरात पोलिसांनी स्वामीला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती, त्यामध्ये त्याला अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात सहा वर्षांची शिक्षा झाली. सुटका झाल्यानंतर, त्याने पुन्हा घरफोड्या सुरू केल्या, तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. २०२४ मध्ये सुटका झाल्यानंतर, तो बेंगळुरूला गेला, जिथे त्याने त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमध्येही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
अभिनेत्रींसह अनेक महिलांशी संबंध
तपासात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आरोपी स्वामीचे अनेक महिलांसह अभिनेत्रींशीही संबंध आहेत. त्याने महिलांवर खूप पैसे खर्च केले आहेत. त्याला पत्नी आणि एक मूल असूनही त्याने कोलकाता येथील त्याच्या प्रेयसीला ३ कोटी रुपयांचे घर बांधून दिले आहे. अनेकदा तो एकटाच चोऱ्या करतो, रिकामी घरे पाहतो आणि त्यांना लक्ष्य करतो.”