Madhya Pradesh Thief Spa Escape: मध्य प्रदेशच्या रतलाम येथील तुरुंग अधिकारी पोलिसांना ‘स्पा’मध्ये जाऊन मसाज करणे चांगलेच भारी पडले आहे. पोलीस शिपाई मसाजचा आनंद लुटत असताना त्यांच्या ताब्यातील दरोडेखोराने तिथून धूम ठोकली. या घटनेमुळे रतलाममध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाची यामुळे खिल्ली उडवली जात असताना उज्जैनच्या पोलीस अधीक्षकांनी आता दोन्ही शिपायांना बडतर्फ केले आहे. तसेच दोघांच्या विरोधात एफआयआरदेखील दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय आहे?

उज्जैनच्या नागदा येथील प्रकाश नगर भागात असलेल्या शिव बाबा मद्य कंपनीच्या कार्यालयावर २५ डिसेंबर रोजी दरोडा पडला होता. पाच दरोडेखोरांनी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून १८ लाख रुपये लुटले होते. या लुटीनंतर पाचही आरोपी फरार झाले होते. दरोड्यातील मुख्य आरोपी रोहित शर्माला ५ जानेवारी रोजी अटक करून खाचरोदच्या उपकारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. तसेच त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.

पायावर उपचार करण्यासाठी खाचरोद उपकारागृहातील शिपाई राजेश श्रीवास्तव आणि नितीन दलोदिया यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता आरोपी रोहित शर्माला घेऊन शासकीय रुग्णालयात गेले. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत तिघेही परत न आल्यामुळे कारागृह अधीक्षकांनी राजेश श्रीवास्तवला फोन करून चौकशी केली. तेव्हा श्रीवास्तवने सांगितले की, आरोपी रोहित शर्मा रुग्णालयातून पळाला.

मात्र या दाव्यावर अधिकाऱ्यांना विश्वास बसला नाही. त्यामुळे दोन्ही शिपायांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी आणि दोन्ही शिपाई १२ ते १२.३० च्या दरम्यान तिथून निघून गेल्याचे स्पष्ट दिसत होते. यानंतर समजले की, रुग्णालयातून उपचार घेऊन परतत असताना कारागृहात न येता. दोन्ही शिपाई आरोपीला घेऊन खाचरोद पासून ३० किलोमीटर दूर रतलाम स्थानकानजीक असलेल्या स्पा सेंटरमध्ये मसाजसाठी गेले. ही माहिती मिळाल्यानंतर कारागृह अधीक्षकांनी स्पा सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

स्पा सेंटरमध्ये गेल्यानंतर दोन्ही शिपाई वेगवेगळ्या खोल्यात मसाजचा आनंद लुटत होते. त्यावेळी बाहेर थांबलेला आरोपी रोहित शर्माने तिथून पळ काढला. कारागृह अधीक्षक सुरेंद्र सिंह राणावत यांनी आरोपी रोहित शर्मा आणि दोन्ही शिपायांच्या विरोधात भारत न्याय संहितेअंतर्गत २६२, २६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना निलंबितही केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief flees cop custody as police get massages in madhya pradesh kvg