Bengaluru Theft CCTV Footage: चोरीच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून सातत्याने केलं जातं. विशेषत: रात्रीच्या वेळी अशा घटना सर्रास घडल्याचं समोर आलं आहे. पण चक्क ऐन वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला उभ्या कारची काच फोडून आतील लॅपटॉप आणि इतर सामानाची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार बेंगलुरूमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. एक सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते याच घटनेचं असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी कारची काच फोडल्याचा आवाजही आसपासच्या लोकांना आला नाही!
नेमकं काय घडलं?
ही घटना २२ ऑगस्टला बेंगलुरूच्या इंदिरा नगरमध्ये घडली. या भागातील एका रहदारीच्या रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास काही चोरांनी पार्किंगला उभ्या कारची काच फोडून आतली बॅग पळवली. या बॅगेमध्ये लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचं साहित्य होतं. सूर्या नावाच्या एका एक्स युजरनं यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली असून त्यामध्ये अशा एकूण चार कारमध्ये चोरांनी चोरी केली असून त्यातील एक कार आपलीही असल्याचं या पोस्टमध्ये सूर्यानं म्हटलं आहे.
इंदिरा नगरच्या ग्लोबल देसी स्टोअर व वेस्टसाइड शोरूमजवळील १०० फूट रस्त्याच्या कडेला ही कार पार्क केली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास काही चोर कारजवळ आले. त्यातील एकानं कारजवळ उभ्या असणाऱ्या सुरक्षारक्षकाचं लक्ष बोलण्यात गुंतवलं. तोपर्यंत कारजवळ गेलेल्या चोरानं काच फोडून आतील सामान घेऊन तिथून काढता पाय घेतला. हे सगळं इतक्या शिताफीनं आणि बेमालूपमध्ये केलं गेलं, की सुरक्षारक्षकाला काही घडलंय हे कळायला सुरक्षारक्षकाला बराच वेळ लागला.
Video: चिमुकल्याला लागला अपहरणकर्त्याचा लळा, आई-वडिलांकडेही जाईना; पोलिसांनी सोडवताच रडू लागला!
आवाज न होता काच फोडण्यासाठी विशेष यंत्राचा वापर?
दरम्यान, चोरांपैकी एकानं कोणताही आवाज न करता कारची काच फोडण्यासाठी विशिष्ट अशा यंत्राचा वापर केल्याचा दावा सूर्यानं त्याच्या पोस्टमध्ये केला आहे. ही घटना नवीन नसून अशाच प्रकारच्या काही घटना या भागात याआधीही घडल्याचं सूर्यानं म्हटलं आहे. त्यामुळे कारचालकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कारमध्ये महत्त्वाचं सामान ठेवू नका!
सूर्यानं त्याच्या पोस्टमध्ये पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची विनंती केली असतानाच रहिवाशांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. “पोलिसांनी कृपया या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व पुन्हा चोरी करण्याआधी या चोरांच्या मुसक्या आवळाव्यात. इतर सर्वांनी काळजी घ्यावी. कुणीही तुमच्या कारमध्ये महत्त्वाचं साहित्य ठेवू नये”, असं सूर्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.