उत्तर प्रदेशमधील गोरखपूर रेल्वे पोलिसांनी एक मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. यानंतर या चोरट्यांच्या टोळीबाबत पोलिसांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्य किती चोऱ्या करण्यात यशस्वी ठरतो, याचा विचार न करता त्याला बड्या कंपनीत नोकरी करत असल्याप्रमाणे त्यांना दरमहिना निश्चित पगार दिला जात होता. इतकेच नाही तर एखादा सदस्य कामासाठी बाहेरगावी गेल्यास त्याला प्रवासी भत्ता आणि जेवणाचा खर्च देखील दिला जात होता.
झारखंड येथील या टोळीचा म्होरक्या मनोज मंडल(३५) आणि त्याचे दोन साथीदार करण कुमार (१९) आणि करणचा १५ वर्षीय अल्पवयीन भाऊ यांचा या टोळीत समावेश होता. या आरोपींना शुक्रवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्थानकाजवळ अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून १० लाख रुपये किमतीचे ४४ मोबाईल जप्त केले आहेत. टोळीचा म्होरक्या मनोज याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत तर करणच्या नावावर दोन गुन्हे आहेत. तर पोलीस अल्पवयीन मुलाचे रेकॉर्ड तपासत आहेत.
गोरखपूर जीआरपी एसपी संदीप कुमार मीना यांनी सांगितले की, टोळीचा प्रमुख मनोज याने चौकशीत माहिती दिली की. तो त्याच्या टोळीतील दोन सदस्यांना प्रत्येकी १५००० रुपये महिना इतका पगार देत होता. याबरोबरच त्यांना मोफत जेवण आणि राहण्याची सोय तसेच बाहेरगावी गेल्यास भत्ता देखील दिला जात असे.
जास्त गर्दी असलेले बाजार आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोबाईल चोरण्यात ही टोळी पटाईत होती. चोरीचे फोन पुढे एका कार्टेलला दिले जात असतं. ज्यांच्या मार्फत ते फोन सीमेपलीकडे बांग्लादेश आणि नेपाळला पाठवले जात. त्यामुळे फोन ट्रॅक करणे आणि गँगचा पर्दाफाश होणं आणखी अवघड जात होतं, असेही मीना यांनी सांगितले.
मीना यांनी पुढे बोलताना सांगितले की, पोलिसांनी आठवडाभर मेहनत घेतली, त्यानंतर २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गोळा केलेल्या फुटेजवरून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेताल. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. जीआरपीने आरोपींच्या अटकेवेळी १० लाख रुपये किमतीचे ४४ अँड्रॉइड फोन, एक बंदुक आणि एक चाकू जप्त केला आहे.
ही टोळी कशी काम करत असे याबद्दल माहिती देताना मीना यांनी सांगितले की, टोळीचा प्रमुख मनोज हा त्याच्या सहेबागंज येथे पैशांची गरज असलेल्या तरूणांचा शोध घेत असे. याच्या टोळीतील सदस्य चांगल्या कपड्यात वावरायचे आणि व्यवस्थित हिंदी बोलायचे त्यामुळे बस आणि रेल्वेत प्रवास करत असताना त्यांच्यावर कोणी शंका घेत नसे.
पोलीस अधिकार्याने सांगितले की, मनोज हा सुरुवातीला तीन महिने प्रशिक्षण देऊन त्यांना लहान टार्गेट देत असे. जो कोणी हे लहान टार्गेट पूर्ण करेल त्याला टोळीत सहभागी करून घेतले जात असे आणि त्याला नियमित पगार दिला जात असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्य संशय येऊ नये म्हणून रेल्वेचे तिकीट रिझर्व्ह करत असत आणि प्रवासादरम्यान बऱ्याचदा बोगीही बदलत. इतकेच नाही तर चोरीचा फोन मूळ किमतीच्या ३०-४० टक्के किमतीला विकण्यासाठी ते फोनच्या मॉडेलचा इंटरनेटवर शोध घेत असत. दरम्यान टोळी आणि त्यांच्या सदस्यांबाबत मनोजची अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.