पाकिस्तानमधील दोन भुरट्या चोरांना पोलिसांनी काही सेल्फीच्या मदतीने अटक केली आहे. या चोरांनी चोरलेल्या फोनमधून काढलेले सेल्फी गुगलच्या फोटो बॅकअपला जातात हे त्यांना ठाऊक नव्हते. याच फोटो बॅकअपवरून चोरांचा माग काढत पोलिसांनी या दोघांना कराची शहरामधून अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नादीम आणि माजीद असं अटक करण्यात आलेल्या दोन चोरांची नावे आहेत. त्यांनी बंदूकीचा धाक दाखवत कराचीमधील डिफेन्स हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या इरम अल्ताफ या महिलेचा मोबाइल चोरला. २७ डिसेंबर रोजी घडलेल्या या चोरीच्या घटनेनंतर इरमने दरख्शा पोलीस स्थानकामध्ये २९ डिसेंबरला तक्रार दाखल केली. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर काही दिवसांमध्येच इरमच्या गुगल बॅकअपमध्ये या चोरांनी फोनवरून काढलेले सेल्फी दिसू लागले. तिने हे सर्व फोटो पोलिसांना दाखवले. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत त्या फोटोंच्या आधारे राष्ट्रीय माहिती आणि नोंदणी प्राधिकरणाकडून या दोघांबद्दलची माहिती मिळवली. त्यानंतर दरख्शा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. अटक केल्यानंतर या दोघांकडे चोरलेल्या फोनबरोबरच इतर चोरलेल्या वस्तू आणि अनधिकृत हत्यारेही जप्त करण्यात आल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

अनेकांनी या चोरांचे फोटो शेअर करत त्यांच्या बावळटपणावर मते व्यक्त केली आहेत तर दुसरीकडे पोलिसांनी दाखवलेल्या समयसुचकतेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. सेल्फीने तुरुंगात पोहचवल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे सेल्फीचे दुष्परिणाम दिसत असतानाच दुसरीकडे सेल्फीमुळे अशा टेकसेव्ही नसणाऱ्या चोरांना पकडण्याचे प्रमाणही वाढले आहे.