उत्तर प्रदेशमध्ये मुघल काळापासून खेळला जाणारा ‘कबुतरबाजी’ हा खेळ चांगलाच प्रसिद्ध आहे. मेरठमधील मोहम्मद कय्युम यांचे कुटुंबिय अनेक पिढ्यांपासून या खेळासाठी कबुतर पाळत आले आहेत. त्यांच्याकडे विविध रंगांची, विविध जातीची शेकडो कबुतरे होती. घराच्या गच्चीवर अनेक लाकडी पिंजऱ्यांमध्ये कबुतरे पाळण्यात आली होती. याच ठिकाणी ते कबुतरांना खायला घालत आणि कबुतरबाजी खेळाचे प्रशिक्षण देत असत. सोमवारी सकाळी जेव्हा ६५ वर्षीय कय्युम रोजच्याप्रमाणे गच्चीवर गेले आणि त्यांना धक्काच बसला. सर्व लाकडी पिंजरे रिकामे होते. त्यांच्या गच्चीवरून ४०० कबुतर गायब झाली होती.
मोहम्मद कय्युम यांनी सांगितले की, माझ्या गच्चीवरून दहा लाख रुपये किंमतीची ४०० कबुतरे गायब झाली आहेत. रविवारी रात्रीच कबुतरांची चोरी झाली असावी. कय्युम यांच्याकडे काही परदेशी जातीची कबुतरेही होती.
मेरठ शहराचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह म्हणाले की, लिसाडी गेट पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. सिंह पुढे म्हणाले, मोहम्मद कय्युम यांचे घर ज्या परिसरात आहे, त्याच्या आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चोर शिडी घेऊन आले असावे. शिडीने गच्चीवर गेल्यानंतर त्यांनी कबुतर पळविले. याव्यतिरिक्त चोरांनी दुसऱ्या कोणत्याच वस्तूला हात लावलेला नाही.
कय्युम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कबुतर परिसरात खूप लोकप्रिय होते. अनेक पक्षी प्रेमी त्यांच्या गच्चीवर कबुतर पाहण्यासाठी येत असत. कुणालाही न कळता चोरांनी ४०० कबुतरे कशी लांबविली असतील, याचेच आम्हाला आश्चर्य वाटत आहे.