इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध अद्यापही सुरुच आहे. अशात भारतातल्या राजकीय पक्षांमध्ये यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य समोर आलं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका होते आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी शरद पवारांवर टीका करत आता ते बहुदा सुप्रिया सुळेंना गाझा सीमेवर पाठवतील असा टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले हिमंता बिस्वा सर्मा

“मला वाटतं की सुप्रिया सुळेंना शरद पवार हमासच्या दहशतवाद्यांशी लढायला गाझाला पाठवतील.” असं म्हणत शरद पवारांच्या वक्तव्यावर हिमंता बिस्वा सरमा यांनी टोला लगावला आहे. मिडल इस्टमध्ये जो संघर्ष सुरु आहे त्याबाबत विचारलं असता सरमा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं की ज्या भागात युद्ध सुरु आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झालं आणि इस्रायल हा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. मात्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्दैवाने इस्रायलची बाजू घेतली आहे. जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या टीकेचा समाचार आता भाजपाकडून घेतला जातो आहे.

हे पण वाचा- “शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठिशी का उभे राहत आहेत? हे सगळं मतांच्या…”, भाजपाचा सवाल

विनोद तावडेंची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या पाठीशी उभे राहिले आहेत, यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की सध्या जगात सुरू असणारी लढाई ही दहशतवाद आणि दहशतवादविरोधी राष्ट्रे यांच्यादरम्यान सुरू आहे. अशावेळी दहशतवादी देशाविरोधात उभे राहून इस्रायलला पाठिंबा देणे क्रमप्राप्तच आहे. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २६/११चा दहशतवादी हल्ला यांसारख्या घटना, त्यामध्ये किती लोक बळी गेले, हे सर्व शरद पवार यांनी आठवावे. असे असतानाही शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत? हे सर्व मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे जनता जाणतेच! असं म्हणत विनोद तावडेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचीही टीका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर याच मुद्द्यावरुन टीका केली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला. शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: 26/11 च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा. अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Think sharad pawar will send his daughter supriya sule to gaza said himanta sarma scj