जागतिक दबावापुढे न झुकता, उत्तर कोरियाने यशस्वीपणे सलग तिसरी अणुचाचणी केली. एकीकडे अधिक शक्तिशाली अण्वस्त्राची चाचणी केल्याचा दावा करीत असतानाच, दुसरीकडे आपण केवळ ‘लघु प्रतीकात्मक’ उपकरणाची चाचणी केली असल्याचे उत्तर कोरिया सरकारतर्फे सांगण्यात आले.
अण्वस्त्रे ही दुर्दैवाने केवळ अमेरिकेची मालकी ठरू लागली असल्याचा दावा कोरियाच्या सरकारने केला. मात्र उत्तर कोरियाचा ‘लघु प्रतीकात्मक उपकरणाचा’ दावा म्हणजे, आंतरखंडीय अण्वस्त्रांच्या सज्जतेकडे आणखी एक पाऊल टाकण्याचाच प्रकार असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत आहे. बराक ओबामा राष्ट्राला उद्देशून संबोधणार होते. नेमकी तीच वेळ उत्तर कोरिया सरकारने आपल्या चाचण्यांसाठी हेरली आणि जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. २००६मध्ये उत्तर कोरियाने पहिली तर २००९ मध्ये दुसरी अणुचाचणी केली होती. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर निर्बंध लादले होते. मंगळवारी तिसरी चाचणी घेतल्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले.
अतिप्रक्षोभक कृत्य
उत्तर कोरियाने अलीकडेच केलेली अणुचाचणी हे अतिप्रक्षोभक कृत्य असल्याचे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांच्याविरुद्ध योग्य आणि विश्वासार्ह कारवाई करणे भाग पडणार आहे, असेही ओबामा यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा