जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. १४ फेब्रुवारी रोजी जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटके भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसवर आदळवून हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यानंतर देशभऱातून दहशतवादी कृत्यासाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलने करुन पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारी पातळीवरून जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळून त्यांना एकटं पाडण्याच्या दृष्टीने भारत सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. तर तिकडे काश्मीरमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर शंभर तासांच्या आत भारतीय सैन्याने या हल्ल्याचा काश्मीरमधील मास्टर माईंड कमरान उर्फ गाझी अब्दुल रशीदला कंठस्थान घातले आहे.
शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. भारतातील अनेक कंपन्यांनी आणि सामान्यांनी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केले आहे. क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा केली आहे. अनेक भारतीय भारत के वीर, पेटीएम यासारख्या माध्यमातून देणगी देत या मदतीमध्ये आपला हातभार लावताना दिसत आहे. असे असतानाच भारतापासून हजारो किलोमीटर दूर अमेरिकेतील विवेक पटेल हा अनिवासी भारतीय नागरिक या हल्ल्यामुळे खूप दुखावला गेला असून त्यानेही या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुळचा गुजरातमधील वडोदरा येथील असणारा २६ वर्षीय विवेकने भारतीय वेबसाईट्स आंतरराष्ट्रीय कार्डच्या माध्यमातून देणगी स्वीकारली जात नसल्याने आपल्या पद्धतीने देणगी गोळा करण्यास सुरुवात केली. “मी भारत के वीर या वेबसाईटवरुन जवानांसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे माझे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डवरून रक्कम देण्याची सोय उपलब्ध नसल्याचे दिसले. तसेच जास्त संख्येने लोक या साईटवर आल्याने ती सतत क्रॅश होत असल्याचा अनुभव मला आल्याने मी माझ्यापद्धतीने या कुटुंबांसाठी मदत गोळा करण्याचा निर्णय घेतला’ असं विवेकने इंडिया टाइम्सशी बोलताना सांगितले. उरी सिनेमा पाहून देशाच्या जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. त्याचवेळी पुलवामा हल्ल्यासंदर्भातील बातम्या पहिल्यानंतर मी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने फेसबुकच्या माध्यमातून फंड रेझर उपक्रम सुरु केल्याचं विवेकनं सांगितलं. मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे होते त्यामुळे मी फेसबुकचा वापर केला. त्याने पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ तारखेला फेसबुकवर पुलवामामधील शहीदांसाठी फंड रेझर सुरु केले. फंड रेझर सुविधा सध्या भारतातील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या देशांमध्ये ही सुविधा आहे तेच लोक यासाठी देणगी देऊ शकतात. या फंड रेझरच्या माध्यमातून पाच लाख अमेरिकन डॉलर इतकी मदत गोळा करण्याचे उद्देश विवेकने डोळ्यासमोर ठेवले होते.
व्हर्जिनिया येथील एका कंपनीत काम करणाऱ्या विवेकने आपल्या फेसबुक फ्रेण्डसच्या मदतीने मदतनिधी गोळा करण्यास सुरुवात केली. मोबाइल मेसेजेस, अॅप्लिकेशन्सवरील मेसेजेस आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून त्याने अवघ्या १२ तासांमध्ये २ लाख ५२ हजार डॉलर म्हणजेच १ कोटीं ७९ लाखांहून अधिक रुपयांची मदत गोळा केली.
अवघ्या चार दिवसांमध्येच विवेकच्या फंड रेजरचे त्याचे ५ लाख अमेरिकन डॉलरचे उद्दीष्ट पूर्ण करत चक्क ८ लाख ४ हजार ७४७ डॉलर इतका निधी गोळा केला आहे. पाच दिवसांमध्ये या फंड रेझरच्या माध्यमातून पुलवामातील शहीदांसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी गोळा झाला आहे.
विवेकच्या या प्रयत्नांमुळे परदेशातील भारतीयांना पुलवामामधील शहीदांसाठी मदत करणे सोपे होणार आहे. भारत के वीर या साईटवर आंतरराष्ट्रीय कार्डच्या माध्यमातून सैनिकांसाठी मदत करता येत नाही हेही यामुळे समोर आले आहे. सरकारने योग्य ती पावले उचलून परदेशातील भारतीय नागरिंकानाही अशा कार्यासाठी मदत निधी देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. ‘मी हा फंड रेझर सुरु केल्यानंतर मला ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच जर्मनीमधूनही अनेकांनी फोन करुन आम्हाला भारतीय सैनिकांना मदत करायची असल्याचे सांगितले’ असं विवेक म्हणतो. यावरुनच केवळ सोय उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही परदेशातील भारतीय नागरिकांना भारतीय सैनिकांना मदत करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते.
विवेकच्या या मोहिमेला हळूहळू अनेकांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. शिकागोमधील देसी जंक्शन या रेडिओ चॅनेलनेही या मोहिमेला पाठिंबा देणारी पोस्ट आपल्या फेसबुकवरुन केली आहे. शिकागोमधील भारतीय वकिलाती तसेच भारतीय संरक्षण दल आणि परराष्ट्र मंत्रालयाला या उपक्रमाची माहिती देण्यात आल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोमवार संध्याकाळपर्यंत २१ हजारहून अधिक जणांनी विवेकच्या या मोहिमेअंतर्गत देणगी दिली होती. तर फंड रेझरची पोस्ट शेअर करुन इतरांपर्यंत पोहचवणाऱ्यांचा आकडा ७५ हजार इतका होता. देसी जंक्शन या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून विवेकने देणगीदारांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. यावेळी तो म्हणाला, ‘काहीही झाले तरी शेवटी आपण भारतीय आहोत. आपण कुठेही जन्माला आलो असू, कोठेही राहत असून त्याने काही फरक पडत नाही कारण शेवटी तुम्ही तुमची ओळख भारतीय अशीच करुन देता. आपण जवानांनी केलेल्या बलिदानाचे मोल पैशात मोजू शकत नाही पण त्यांच्या कुटुंबांना नक्कीच आर्थिक मदत करु शकतो.’

आता इतकी मोठी रक्कम भारतामध्ये योग्य पद्धतीने येईल यासाठी विवेक प्रयत्न करत आहे. विवेक सध्या इमेलच्या माध्यमातून सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती इंडियाटाइम्सला सीआरपीएफचे डेप्युटी इन्सपेक्टर जनरल विजय कुमार यांनी दिली. ‘सध्या वेबसाईटवरुन आंतरराष्ट्रीय कार्डच्या माध्यमातून मदत स्वीकारता येत नसून आम्ही पटेल यांच्याशी मेलवरुन संपर्कात आहोत. त्यांना काय मदत हवी आहे याची माहिती घेऊन आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून गोळा झालेला हा मदतनिधी योग्य पद्धतीने भारतात यावा यासाठी योग्य तो निर्णय घेऊ’ असं कुमार म्हणाले.