जौनपूर : लोकसभा निवडणूक देशासाठी एक मजबूत सरकार चालवू शकेल असा नेता निवडण्याची संधी आहे. भारताच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करून देणारा पंतप्रधान निवडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे केले. जौनपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कृपाशंकर सिंह आणि मछली शहर (राखीव) मतदारसंघातील बी. पी. सरोज यांच्या प्रचरार्थ जौनपूर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत मोदी बोलत होते.
हेही वाचा >>> कोणताही ‘अपवाद’ नाही! केजरीवाल यांच्या जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
‘‘ही निवडणूक म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडण्याची संधी आहे. जो एक मजबूत सरकार चालवू शकतो असा पंतप्रधान निवडा. ज्यावर जगाचे वर्चस्व असू शकत नाही. परंतु जगाला भारताच्या सामर्थ्याची तो जाणीव करून देऊ शकेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा तुम्ही कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून, सरोज यांना मछली शहरमधून मतदान करता, तेव्हा तुमच्या मताने एक मजबूत सरकार बनेल. त्यांना दिलेली मते थेट मोदींच्या खात्यात जमा होतील, असे पंतप्रधान म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून असत्य माहिती पसरवली जात आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.