भगवान अयप्पाच्या भक्तांचे आंदोलन दडपून केरळ सरकार शबरीमाला मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी केला. शबरीमाला मंदिरातील आंदोलनकर्त्यांना क्रूर वागणूक दिली जात असून त्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा आहे असे ते म्हणाले.
आज केरळमध्ये धार्मिक विश्वास आणि राज्य सरकारच्या क्रूरते विरोधात संघर्ष सुरु आहे. भाजपा, आरएसएस आणि अन्य संघटनांच्या जवळपास २ हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आम्ही भाविकांसोबतच उभे राहणार असे अमित शाह कन्नूर येथील सभेत म्हणाले.
मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी उठवली. पण मंदिर परिसरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे अजूनपर्यंत एकही महिला मंदिरात प्रवेश करु शकलेली नाही.
Amit Shah who threatened to topple our government should remember that this government came to power, not at the mercy of BJP, but the people’s mandate. His message is to sabotage the people’s mandate: Kerala CM Pinarayi Vijayan pic.twitter.com/qj1UIGND1c
— ANI (@ANI) October 27, 2018
दरम्यान अमित शाह यांनी केलेल्या आरोपांना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी उत्तर दिले आहे. अमित शाह यांनी आमचे सरकार पाडण्याची धमकी दिली आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि, हे सरकार जनतेने निवडून दिले आहे. भाजपाच्या दयेवर सरकार स्थापन झालेले नाही. शबरीमाला मंदिरासंबंधी अमित शाह यांची वक्तव्ये संविधान आणि कायद्याच्या विरोधात आहेत. मूलभूत अधिकार नाकारण्याचा त्यांचा अजेंडा यातून दिसतो असे विजयन म्हणाले.