सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत, सोमवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यात एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले. या घटनेवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशासाठी ही लाजिरवाणी बाब असल्याचं ते म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करतो, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह नागरिकांना जीव गमावावा लागला. परदेशी पाहुणे भारतात आलेले असताना अशाप्रकारचा हिंसचार उफळणे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे.”  असं ओवेसी म्हणाले आहेत.

आणखी वाचा – दिल्ली हिंसाचार : मौजपूरमध्ये गोळीबार करणारा तरुण पकडला

दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले.

आणखी वाचा – ‘ये कहाँ आ गए हम’ म्हणत शशी थरूर यांची दिल्ली हिंसाचारावर टीका

हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी जवान तनात करण्यात आले. पोलिसांनी अश्रुधुरांच्या कांडय़ा फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मेट्रो रेल्वे स्थानकेही बंद करण्यात आली आहेत. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या काही तास आधी हिंसाचार भडकला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is a shame for the country that violence broke out when foreign dignitaries are on a visit here owaisi msr