मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहीमेतंर्गत सुरू करण्यात आलेल्या पोर्टलद्वारे सामान्य जनतेसाठी आता एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रांगेमध्ये ताटकळत उभे राहणे किंवा एखाद्याची खुशामत करण्याचा सामान्यांचा त्रास टळू शकतो. कारण, या पोर्टलद्वारे नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या आगाऊ भेटीची वेळ ऑनलाईन पद्धतीने निश्चित करता येणार आहे. राष्ट्रीय माहिती केंद्राकडून हाताळण्यात येणारे ‘myvisit.gov.in’ हे पोर्टल ‘डिजिटल इंडिया’ मोहीमेतंर्गत सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांशी आणि खात्यांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनातील सनदी अधिकारीदेखील सामान्यांशी संवाद साधू शकणार आहेत. या पोर्टलला भेट देणाऱ्या प्रत्येकाची माहिती स्वयंचलित पद्धतीने डेटाबेसमध्ये साठविण्यात येणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांशी भेट निश्चित करण्यासाठी नागरिकांना एक साधा नोंदणी अर्ज भरावा लागणार आहे. यामध्ये भेट घेऊ इच्छिणाऱ्यांना स्वत:चे नाव, पत्ता यांसारखी प्राथमिक माहिती भरून द्यावी लागणार आहे. ही अर्ज नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक देणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्या विभागातील अधिकाऱ्याची भेट घ्यायची आहे आणि कोणत्या हेतूने भेट घ्यायची आहे, ते कारण ऑनलाईन अर्जात नमूद करावे लागणार आहे. हा अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणी क्रमांक देण्यात येईल. या नोंदणी क्रमांकाद्वारे अर्जदार प्रत्येकवेळी आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकेल. सध्या माहिती अधिकारातंर्गत अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
अर्जदरांकडून त्याला ज्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे तो योग्य असल्याची पडताळणी आणि खातरजमा झाल्यानंतर संबंधित अर्जाला मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराला मोबाईल मेसेज किंवा ई-मेलद्वारे सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ कळविण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा