आज राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या बालरुपातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी ११ दिवसांचा उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाला साष्टांग नमस्कारही केला. तसंच इतक्या वर्षांची प्रतीक्षा आज संपल्याचंही ते म्हणाले. या सगळ्याबाबत आता ऑल इंडिया इमामर संघटनेचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांची प्रतिक्रिया आली आहे. आज अयोध्येत जो सोहळा झाला ते बदलत्या भारताचं चित्र आहे. असं इलियासी म्हणाले.
काय म्हणाले इलियासी?
“आज जे घडलं ते बदलत्या भारताचं चित्र आहे. आजचा भारत हा उत्तम भारत आहे. माझ्या बरोबर हे स्वामी उभे आहेत. याचंच नाव भारत आहे. मी इथे प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे. आमच्या पूजा पद्धती नक्कीच वेगळ्या असू शकतात, धार्मिक धारणा वेगळ्या असू शकतात, आस्था वेगळ्या असू शकतात. मात्र आमचा सर्वात मोठा धर्म माणुसकीचा आहे. आपण सगळे भारतीय आहोत. आमच्यासाठी राष्ट्र सर्वतोपरी आहे. आता आपण तिरस्कार आणि द्वेषभावना मागे सोडली पाहिजे. आत्तापर्यंत खूप लोक मारले गेले, त्यावरुन राजकारणही झालं. आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन भारतातली एकजूट कायम ठेवायची आहे. अखंड भारताच्या निर्मितीसाठी आपण पुढे गेलं पाहिजे. हाच आमचा संदेश आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचं नेतृत्व करत आहेत, आता सगळ्यांनी एक होऊन राष्ट्र मजबूत करावं” असं इलियासी यांनी म्हटलं आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विशेष पाहुण्यांची उपस्थिती होती.
आता नवराष्ट्र निर्मिती होणार
आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत. आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो.
बऱ्याच कालावधीपासून ज्या आपत्ती येत आहेत त्या संपल्या. त्यावेळी रामाला १४ वर्षे वनवास सहन करावा लागला. तर या युगात आपल्याला शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला आहे. भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतिमध्ये रामाचं चित्र आहे. संविधान असित्त्वात आल्यानंतरही काही दशकं रामाची जन्मभूमी कुठली त्याचे खटले चालले. न्यायपालिकेचे आभार मानतो त्यांनी न्यायाची लाज राखली. प्रभू रामाचं मंदिरही न्यायिक पद्धतीनेच उभं राहिलं आहे. आजच्या घडीला मंदिरांमध्ये उत्सव होत आहेत, आज सगळा देश दिवाळी साजरी करतो आहे. आज सगळ्या देशात घरोघरी रामज्योती प्रज्वलित केली जाईल याचा मला विश्वास आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.