महत्त्वाच्या आणि गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील तिकीटे सर्वसामान्य प्रवाशांना उपलब्ध होत नाहीत. पण दलालांना ही तिकीटे कशी काय लगेच मिळतात, याचा प्रश्न आतापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना पडत होता. मात्र, रेल्वे मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत चौकशीतून या प्रकारामागील तथ्य बाहेर आले आहे. तिकीट आरक्षण संगणकीय प्रणालीतील सुविधेचा फायदा घेऊन दलाल ही तिकीटे आरक्षित करीत असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.
चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, दलाल कमी गर्दीच्या मार्गावरील तिकीटे संबंधित प्रवाशाच्या नावाने आदल्या दिवशी आरक्षित करून ठेवत असत आणि त्यानंतर प्रवाशांच्या गरजेनुसार दुसऱया दिवशी काऊंटर सुरू झाल्यावर हेच तिकीट गर्दीच्या मार्गावरील रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदलून देत असत. तिकीट आरक्षणच्या संगणकप्रणालीमध्ये आरक्षित तिकीट खरेदी केलेला प्रवासी त्याच्या यात्रेचा मार्ग आणि रेल्वेमध्ये बदल करू शकतो. याच सुविधेचा वापर करून दलाल कमी गर्दीच्या मार्गावरील तिकीट प्रवाशांना हव्या असलेल्या रेल्वेच्या तिकीटामध्ये बदलून घेत असत. प्रवाशाची सर्व माहिती आदल्याच दिवशी संगणकप्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेली असल्यामुळे दुसऱया दिवशी तिकीट काऊंटरवरील रेल्वे कर्मचाऱयाला केवळ त्याचा ‘पीएनआर’ बदलण्याची गरज असते. याला फार कमी वेळ लागतो. त्यामुळे अवघ्या काही सेकंदामध्ये दलाल वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावरील तिकीटे आरक्षित करू शकत असत, असे रेल्वे बोर्डाचे सदस्य अजय शुक्ला यांनी सांगितले.
आरक्षणाची सुविधा सकाळी आठ वाजता सुरू झाल्यानंतर यामुळे एका मिनिटात ४००० कन्फर्म तिकीटे दलालांना मिळू शकत होती. त्यामुळे अगदी आठ वाजून एक मिनिटांनीही प्रामाणिकपणे रांगेत उभे राहिलेल्या प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळू शकत नव्हते.
चौकशीतून ही बाब उघड झाल्यानंतर आता सकाळी आठ वाजता आरक्षण काऊंटर सुरू झाल्यावर पहिल्या एक तासासाठी यात्रेच्या मार्गामध्ये आणि रेल्वेमध्ये बदल करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दलालांना या सुविधेचा वापर करता येत नाही. ही सुविधा बंद केल्यानंतर यात्रेचा मार्ग आणि रेल्वे बदलण्याचे प्रमाण झपाट्याने खाली आले असल्याचेही रेल्वे अधिकाऱयांच्या लक्षात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा