– नामदेव कुंभार
सोलापूरमधील मोहोळ येथील रविवारची सकाळ. रविवार असल्याने शहरावर एक प्रकारचा आळस दिसत होता. मात्र येथील शांतता भंग करत होता तो चौकात वाजणारा शिट्टीचा आवाज. शिट्टी वाजवणाऱ्याचा पोषाखही त्याच्या कृती इतकाच वेगळा. अंगात पांढरा सदरा आणि पँट पण त्यावरही ‘मतदान करा’ असं लिहीलेलं होतं. डोक्यावर टोपी अन् टोपीवर पुन्हा ‘मतदान करा’चे स्लोगन्स. सकाळी सकाळी दारात वासूदेव यावा त्याप्रमाणे मतदारांमध्ये मतदानासंदर्भात जागृती करण्यासाठी धडपडणारी व्यक्ती म्हणजे बापूराव गुंड…
देशात वेगवेगळ्या पातळीवर होणाऱ्या निवडणुकींपासून असंख्य मतदार दूर राहतात. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वखर्चाने राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. गेली ३५ वर्षे हा अवलिया स्वत:च्या खर्चातून लोकांमध्ये मतदानाबद्दलची जनजागृती करताना दिसत आहे.
पुण्यातील फुरसुंगीपासून या अवलियाने ३५ वर्षापूर्वी बाईकवरून हा मतदान जागृतीचा प्रवास सुरू केला आहे. पूर्ण राज्यात मतदार जागृती करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. बाईकवरही मतदान जागृतीचे संदेश जागोजागी लिहिलेले दिसतात. गेल्या ३५ वर्षांपासून बापूराव यांनी मतदान जागृतीच्या या आगळ्या वेगळ्या मोहिमेतील खर्च स्वत:च केला आहे. बापूराव हे पेशाने कापड विक्रेते आहेत. निवडणुकांमध्ये मतदानाचा घसलेला टक्का त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी ही मोहीम सुरु केली. सरकार निवडीच्या प्रक्रियेत सर्वांनीच सहभागी व्हायला हवे, असं त्यांना वाटतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणुकांच्या काळात मतदानासाठी जागृती करण्याच्या हेतून बापूराव आपली दुचाकी घेऊन छोटे छोटे दौरे करतात.
‘कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, चोख कर्तव्य पार पाडा, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होते. बाकीचे ४० टक्के लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मी ३५ वर्षांपासून असा पोषाख घालून प्रचार करतो आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक निवडणुकीत १०० टक्के मतदार मतदान करणार नाहीत, तोपर्यंत ही जागृतीची मोहीम सुरूच ठेवणार आहे’, असं बापूराव ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगतात.