कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झालं. ४ जुलै रोजी सकाळी स्वामी यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासून बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर सोमवारी दुपारी १.२४ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली. बांद्र्यातील होली फॅमिली रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांना रुग्णालयातील खाटेला बेड्या ठोकल्याचं यात दिसत आहे. मात्र हा व्हायरल फोटो त्यांचा नसून उत्तर प्रदेशातील एटामधील ८४ वर्षीय आरोपी बाबूराम प्रधान याचा आहे.

उत्तर प्रदेशातील एटामधील कुल्ला हबीबपुर गावातील ८४ वर्षीय बाबूराम प्रधान याला एका हत्येच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर बाबूरामची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. मात्र ९ मे २०२१ रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तुरुेग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृती खालावल्याने अलिगढमधील जेएन मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगतिलं. तिथे बेड उपलब्ध नसल्याने पुन्हा एटा जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या पायाला बेड्या ठोकण्यात आल्या होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. त्यानंतर एटा तुरुंग अधीक्षकांनी वॉर्डरला निलंबित केलं होतं. हा फोटो आता स्टॅन स्वामी यांच्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो त्यांचा नसल्याचं समोर आलं आहे.

पुढच्या महिन्यात करोनाची तिसरी लाट?; SBI च्या अहवालामुळे धास्ती वाढली

बाबूरामने १९८२ साली एका व्यक्तीचं अपहरण करत त्याची हत्या केली होती. १९९७ साली न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्याला पॅरोल मिळाला होता. मात्र २०२० रोजी त्याचा पॅरोलवरील याचिका फेटाळून लावण्यात आली. तसेच तीन महिन्यात बाबूरामला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं. ६ फेब्रुवारी २०२१ पासून बाबूराम तुरुंगात आहे.