योग दिन आणि सुर्यनमस्काराला विरोध करणाऱयांनी देश सोडावा किंवा अशांनी समुद्रात बुडलं पाहिजे अशी मुक्ताफळे भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी उधळली आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर मतदार संघाचे खासदार आदित्यनाथ वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
आदित्यनाथ यांनी मुस्लिम संघटनांच्या सुर्यनमस्कारावरील विरोधावर केलेल्या विधानाने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदार संघात एका मंदिराच्या कार्यक्रमात आदित्यनाथ उपस्थित होते. ते म्हणाले की, ‘ योग दिनाला विरोध करणाऱयांनी देश सोडला पाहिजे. जे लोक सूर्यनमस्कार मानत नाहीत त्यांनी समुद्रात बुडलं पाहिजे किंवा अंधा-या खोलीत जीवन व्यतीत केलं पाहिजे. सूर्य कधीही प्रकाश आणि उर्जा देताना भेदभाव करत नाही, मग ज्यांना सूर्याला नमस्कार करायचा नाही त्यांनी स्वत:ला अंधारात कोंडून घ्यावे. असे लोक भारताची प्रतिष्ठा धुळीत मिळवत आहेत.’
जगातील १०० देश जागतिक योग दिनाला पाठिंबा देत असून यामध्ये ४० मुस्लिम राष्ट्रांचाही समावेश आहे. मग, भारतीय मुस्लिमांनाच योग दिनाचे वावडे कशासाठी? असा सवाल देखील आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader