नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर मर्यादीत राहावे लागले. भाजपा स्वबळावर ३७० आणि एनडीए म्हणून ४०० खासदारांचा टप्पा पार करेल, अशी घोषणा भाजपा नेत्यानी केली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आहे. भाजपा प्रणीत एनडीएला २९५ जागांवरच समाधान मानावे लागले. निवडणुकीआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भाष्य केले होते. ज्यावर त्यावेळी उलटसुलट चर्चाही झाली. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. इंद्रेश कुमार यांनी थेट भाजपाला टोला लगावला आहे. “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने २४० च्या संख्येवर मर्यादित ठेवले”, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानमधील जयपूरजवळच्या कनोटा येथे एका कार्यक्रमात बोलत असताना इंद्रेश कुमार यांनी म्हटले, “ज्यांनी आजवर प्रभू रामाची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले, त्यांना प्रभू रामाने २४० जागांवर अडवले. त्यांचा अहंकार यासाठी कारणीभूत ठरला.” लोकसभेच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारे भाष्य केले होते. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.

इंद्रेश कुमार यांनी फक्त भाजपाच नाही तर काँग्रेसलाही टोला लगावला. भाजपाप्रमाणेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नाव न घेता ते म्हणाले, ज्यांनी प्रभू रामावर श्रद्धा ठेवली नाही. प्रभू रामाला विरोध केला. त्यांनाही २३४ वर मर्यादित राहावे लागले. देवाचा न्याय असा असतो.

“निवडणुकीत राजकीय पक्षांनी शिष्टाचार पाळला नाही, खरा सेवक…”, RSS प्रमुख मोहन भागवतांचं थेट विधान!

निवडणुका म्हणजे युद्ध नाही – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लोकसभेच्या निकालानंतर भाष्य करताना भाजपाला अप्रत्यक्ष खडे बोल सुनावले होते. “लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवे”, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती.

खरा सेवक अहंकारी नसतो

मोहन भागवत पुढे म्हणाले, “एक खरा सेवक काम करताना शिष्टाचार राखतो. शिष्टाचार राखताना तो अविचल राहतो. ‘मी हे केले, ते केले’ असा कोणताही श्रेयवाद करत नाही. सेवक कधीच अहंकार दाखवत नाही. तो नेहमी शिष्टाचार पाळतो. फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणण्याचा अधिकार आहे.”