पश्चिम बंगालमधील बलात्काराच्या विषयावरून तेथील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होणारे बुद्धिवादी आणि सामाजिक कार्यकर्ते हे स्वतः पॉर्नोग्राफी व्यवसायाशी संबंधित असल्याचा घणाघाती आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱया ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून नव्या चर्चेला तोंड फोडलंय.
पश्चिम बंगालमधील काही वृत्तवाहिन्या या डाव्या पक्षांसाठी काम करतात. या वाहिन्यांवरील तथाकथित चर्चेमध्ये बलात्काराबद्दल बोलणारे बुद्धिवादी आणि सामाजिक कार्यकर्ते हे स्वतःच पॉर्नोग्राफी व्यवसायाशी संबंधित आहेत. वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होऊन ते राज्यातील माता-भगिनींचा अपमानच करत आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळेच तरुण पिढी वाईट गोष्टीच्या आहारी जाऊ शकते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत, अशा थाटात या बुद्धिवादी व्यक्ती वावरत असल्या, तरी त्यांनी आपल्या आय़ुष्यात कधीही समाजसेवा केलेली नाही. चर्चेत सहभागी झाल्यामुळे मिळणाऱया पैशाच्या आमिषानेच या व्यक्ती पॅनेलवर येतात. वाहिन्यांवरील हे सर्व ‘टॉक शो’ नसून ‘टाका (पैसे) शो’ आहेत, असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

Story img Loader