खलिस्तानी समर्थक हरदीप निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आहे. तर, लंडनमध्ये पुन्हा खलिस्तानची ठिणगी पडली आहे. परदेशातील भारतीय राजदूतांना धमक्या दिल्या जात आहेत, दूतावासांवर बॉम्ब फेकले जात आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
खलिस्तानी लिबरेशन पुन्हा सक्रिय
“खलिस्तान समर्थक ब्रिटनमधील राष्ट्रवादी भारतप्रेमी शिखांना धमक्या देत आहेत व तेथील पोलीस ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. याआधी लंडनच्या भारतीय दूतावासावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला होता, तिरंगा जाळला होता. ही काय सामान्य गोष्ट म्हणायची? लंडनमध्ये खलिस्तानी लिबरेशन पुन्हा सक्रिय असल्याची ही झलक आहे”, अशी टीका यातून करण्यात आली.
“निज्जर याची हत्या खलिस्तानच्या विझलेल्या चळवळीस प्रेरक ठरत आहे. कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. युरोपमध्येही अशाच घटना घडत आहेत. ‘जी-२०’साठी दिल्लीत जमलेल्या जागतिक मेळ्यात कॅनडाचे पंतप्रधान ‘ट्रुडो’ होते. श्रीमान ट्रुडो यांना पंतप्रधान मोदी यांनी कॅनडातील खलिस्तानी आश्रयस्थानाबाबत जाब विचारल्याची माहिती भक्तांनी पसरवली, पण त्याच वेळी इंग्लंडच्या पंतप्रधानांना लंडनमध्ये फोफावत असलेल्या त्याच भारतविरोधी कारवायांवर जाब विचारण्याचे पंतप्रधानांना सुचले नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल”, असाही हल्लाबोल अग्रलेखातून करण्यात आला.
लंडनही खलिस्तान समर्थक शिखांचा अड्डा
“कॅनडाप्रमाणेच लंडनही खलिस्तान समर्थक शिखांचा अड्डा बनला आहे, पण इंग्लंडचे पंतप्रधान सुनकसाहेब हे भारतीय वंशाचे तसेच सनातन धर्माचे पालनकर्ते, ‘प्राऊड हिंदू’ असल्याने लंडनमधील खलिस्तानी कारवायांवर त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. आता तर सुनकसाहेब क्रिकेट वर्ल्ड कपचा आस्वाद घेण्यासाठी भारतात येणार आहेत. भारतविरोधी कारवायांत लिप्त असलेल्या पाकिस्तान, कॅनडा, बांगलादेशसारख्या देशांना वेगळा न्याय व इंग्लंडला दुसरा न्याय ही कोणती नीती? इंग्लंडच्या ढिलाईमुळेच तेथे खलिस्तानी चळवळीस मुक्त वाव मिळाला आहे. इंग्लंडमध्ये शीख मोठ्या प्रमाणावर आहेत व त्यांच्याकडे ‘व्होट बँक’ म्हणून पाहिले जाते”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
“कॅनडातील खलिस्तान समर्थकांना ब्रिटनमधून बळ मिळत आहे हे स्पष्ट होत आहे. इंग्लंडच्या भूमीवर असलेल्या शिखांच्या प्रार्थनास्थळांत भारतीय राजदूतांना जाता येत नाही, त्यांची गाडी अडवली जाते. ही इंग्लंडमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आहे. सुनकसाहेब भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत, पण या ‘प्राऊड हिंदू’ने त्यांच्या भूमीवर वळवळणारे भारतविरोधी शेपूट ठेचले नाहीच व साधा दमही दिलेला दिसत नाही. खलिस्तानवादी हे हिंसेचे निष्ठावंत पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मागण्या काय, त्यांचा राष्ट्रीय विचार काय, सामाजिक भूमिका काय याविषयी वैचारिक गोंधळ आहे, पण ‘खलिस्तान’ हवे व घेणार हीच त्यांची मागणी आहे. अर्थात हिंसाचार करून त्यांची मागणी कशी पूर्ण होणार?”, असा सवालही यावेळी विचारण्यात आला.
मोदी हे ‘विश्वगुरू’ असले तरी ते…
“आज जी पिढी खलिस्तानची मागणी करीत आहे त्यांनी भारताच्या भूमीवर पाय ठेवलेला नाही, पण त्यांना वेगळा देश हवाय. हा त्यांचा वेगळा देश इंग्लंड आणि कॅनडाच्या भूमीवर मागणे अधिक संयुक्तिक ठरेल. ज्या पंजाबमध्ये महाराजा रणजितसिंगांनी एकेकाळी इंग्रजांशी लढून भारताचे स्वातंत्र्य राखले, त्याच इंग्रज भूमीवर भारताला तोडण्याचे कारस्थान स्वतःला महाराजा रणजितसिंग यांचे अनुयायी म्हणवून घेणारे काही मूठभर लोक करीत आहेत. प्रश्न इतकाच आहे की, आपले पंतप्रधान मोदी हे ‘विश्वगुरू’ असले तरी ते भारतविरोधी फौजांचा बीमोड करू शकलेले नाहीत”, अशी टीकाही ठाकरे गटाने केली.
ही सामान्य बाब २०२४ च्या निवडणुकांपर्यंत अशीच चालू देणार का?
“कॅनडा आणि इंग्लंडमधील मूठभर खलिस्तानवादी म्हणजे संपूर्ण शीख समाज नाही, पण देशातील वातावरण बिघडविण्यास हा मूठभर समाज कारणीभूत ठरतो आहे. हे जितके धर्मकारण तितकेच राजकारण आहे. कॅनडा, इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयांवर बॉम्ब फेकणे, तिरंगा जाळणे, उच्चायुक्तांची गाडी अडवणे, मंदिरांवर हल्ले करणे ही बाब सामान्य नाही असे परराष्ट्रमंत्री जयशंकर सांगतात ते खरेच आहे, पण ही सामान्य बाब २०२४ च्या निवडणुकांपर्यंत अशीच चालू देणार का? हाच खरा प्रश्न आहे”, असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.