मॉस्कोतील शस्त्रास्त्रांच्या आगारात झालेल्या स्फोटांच्या मालिकेमुळे आगाराच्या खिडक्या तुटून आग पसरल्याने नजीकच्या परिसरातील सहा हजारांहून अधिक लोकांना एका रात्रीत सुरक्षित स्थळी हलवावे लागल्याचे आपत्कालीन मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. मॉस्कोपासून जवळपास एक हजार कि.मी. अंतरावर असलेल्या छापायेव्हस्क शहरानजीकच्या शस्त्रास्त्र आगारात बुधवारी रात्री स्फोटांना सुरुवात झाली. सदर आगारात मोठय़ा प्रमाणावर दारूगोळा असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगारातून काळ्या धुराचे लोट बाहेर येत असल्याचे फुटेज रशियाच्या दूरचित्रवाणीवरून दाखविण्यात येत होते. तर रात्रभर दर मिनिटाला एक स्फोट होत असल्याचे एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले.
या आगाराजवळ असलेल्या नागोर्नीमधून सहा हजारांहून अधिक नागरिकांना रातोरात तेथून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, असे आपत्कालीन मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. एकूण ४८ जणांवर वैद्यकीय उपचार करावे लागले, तर ११ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याचे सांगण्यात आले.
स्फोटांमुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहायाने पाण्याचे फवारे मारण्यात आले. सकाळपर्यंत स्थिती नियंत्रणात येत होती. जुन्या दारूगोळ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असताना स्फोटांना सुरुवात झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा