तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता देश सोडून पाकिस्तानमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूने स्पिन बोल्डक येथे जमलेले हजारो अफगाणी नागरिक सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक अफगाणी नागरिक त्यांच्या कुटुंबासह दक्षिणेकडील कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. अफगाणिस्तानच्या उत्तर आणि पूर्वेकडील प्रांतांतील कुटुंबांना लवकरात लवकर देश सोडून जायचं आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पाकिस्तानी सैन्याकडून या अफगाणी नागरिकांना देशात प्रवेश करण्यास मनाई केली जात आहे. हे वृत्त पाझवोक अफगाण न्यूजने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने एएनआय या वृत्त संस्थेने दिलं आहे.
सध्या केवळ पाकिस्तानी ओळखपत्र किंवा कंदाहारचं ओळखपत्र असणाऱ्यांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जातो. पाझवोक अफगाण न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. हजारो अफगाणी नागरिकांपैकी एक असलेले अब्दुल वदुद हे गेल्या आठवड्यापासून आपल्या पाच लोकांच्या कुटुंबासह पाकिस्तानला जाण्यासाठी स्पिन बोल्डक सीमेजवळ आले आहेत. वदुद म्हणाले की, तालिबानने देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर आता आम्हाला देश सोडायचा आहे. मला स्वतःच्या आणि माझ्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे.
दररोज जमतात हजारो अफगाणी
वदुद म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानी या अफगाणी नागरिकांना पाकिस्तानात जाऊ देत नाहीत. हजारो अफगाणी दररोज या गेटसमोर जमतात आणि पाकिस्तानात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात पण ते त्यात यशस्वी ठरू शकत नाहीत. पुढे ते यांनी सांगितलं की, पैसे संपल्यानंतर हजारो अफगाणी कुटुंबांप्रमाणे ते देखील भयंकर संकटात सापडला होते आणि आपल्या मुलांसाठी अन्न देखील विकत घेऊ शकत नव्हते. पाझवोक न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानात प्रवेश देण्याचं आवाहन
वदुद पुढे म्हणाले की, अनेक कुटुंबांना स्पिन बोल्डकमधील मोकळ्या शेतात रात्र काढावी लागली. तर अनेक कुटुंबांनी पाकिस्तानात जाण्याच्या आशेने दिवस-रात्र हॉटेलमध्ये घालवले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथे अनेक मुलं, स्त्रिया, वृद्ध आजारी पडत आहेत. या नागरिकांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना किमान मानवतेच्या आधारावर सीमा दरवाजा उघडण्याची आणि आपल्याला पाकिस्तानात प्रवेश करण्याची परवानगी देण्याचं आवाहन केलं आहे.
काहींनी पाकिस्तानात जाण्यासाठी तस्करांना दिले पैसे
नांगरहार प्रांतातून आलेल्या मोहम्मद नसीम यांनी ‘पाझवोक’ला सांगितलं की, ते गेल्या दोन आठवड्यांपासून स्पिन बोल्डक जिल्ह्यात होते. तोरखम क्रॉसिंग बंद झाल्यानंतर ते स्पिन बोल्डकजवळ आले. त्यांना आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात प्रवेश करायचा आहे. नसीम पुढे म्हणाले की, “अनेकांकडे रात्र घालवण्यासाठी पैसे नाहीत. लोक प्रचंड घाबरले आहेत. नोकऱ्या नाहीत, भविष्य अंधारात आहे. लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सगळे मार्ग बंद आहेत.” दरम्यान, काही अडकलेल्या लोकांनी तर असं सांगितलं की, काही कुटुंबांना पाकिस्तानात जाण्यासाठी तस्करांना पाच ते सहा हजार रुपये देण्यास भाग पाडण्यात आलं आहे.
स्पिन बोल्डक येथील आयुक्तांनी पाझवोक अफगाण न्यूजने सांगितलं की, पाकिस्तानने देशातील काही रस्ते आणि बंदरे बंद केल्यामुळे स्पिन बोल्डक-चमन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तर पाकिस्तानकडून केवळ पासपोर्ट किंवा कंदाहार आयडी असलेल्या अफगाणी नागरिकांनाच प्रवेश करण्यास परवानगी देत आहेत.