किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) मागणीसाठी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारने आंदोलकांसमोर डाळी, मका आणि कापूस ही पिके पाच वर्षांच्या कालावधीसाठी किमान आधारभूत किमतींना (एमएसपी) खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. केंद्र सरकारशी करण्यात आलेली चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे आता पंजाब-हरियाणा सीमेवरून शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ हजार शेतकरी १२०० टॅक्टर

शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे दिल्लीच्या सीमेवरील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाब-हरियाणा सीमेवर एकूण १४ हजार शेतकरी जमा झाले असून साधारण १२०० ट्रॅक्टर, २०० कार, १० मिनीबसेसच्या माध्यमातून ते राजधानी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. तर बॅरिकेड्सचा अडथळा दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या वस्तू आणल्या आहेत, त्या जप्त कराव्यात असे आवाहन हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना केले आहे.

एमएसपीसह इतर मागण्यांसाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनीधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

दिल्लीत जाण्यासाठी शेतकरी पुन्हा सज्ज

दुसरीकडे १३ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या सीमेवर थांबलेले शेतकरी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याच शेतकऱ्यांना अडवण्यासाठी दिल्ली पोलीस, वेगवेगळ्या दलाचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. आपला हा मोर्चा पुन्हा एकदा चालू करण्याच्या निर्णयानंतर किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वनसिंग पंढेर यांनी आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. आमच्यापुढे लावण्यात आलेले बॅरिकेड्स काढावेत आणि आम्हाला दिल्लीमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

“आता सरकारने निर्णय घ्यायचा आहे”

“आम्ही आमच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न केला. आम्ही सरकारच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकांना हजर राहिलो. आम्ही सरकारशी सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. आमचे मुद्दे मांडले. आता केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे. आम्ही शांततेत आमचे आंदोलन करणार आहोत. राजधानी दिल्लीत जाण्यासाठी रस्त्यावर टाकण्यात आलेले अडथळे काढण्याची आम्हाला परवानगी द्यावी,” असे पंढेर म्हणाले.

सिंधू सीमेवर १४ हजार शेतकरी

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पंजाब-हरियाणाच्या सिंधू सीमेवर साधारण १४ हजार शेतकरी जमले आहेत. दिल्लीत जाण्यासाठी शेतकरी साधारण १२०० ट्रॅक्टर, २०० कार, १० मिनी बसेसचा वापर करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानुसार धाबी-गुजरन सीमेवर साधारण ४५०० शेतकरी जमा झाले असून त्यांच्याकडे ५०० ट्रॅक्टर्स आहेत.

गाझीपूर सीमा बंद केली जाण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे जाण्यास सुरुवात केल्यामुळे या शहराच्या तीन सीमांवर बुधवारी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. टिकरी, सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. येथे लोखंडी खिळे, क्राँक्रिट ब्लॉक, बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गरज पडल्यास बुधवारी गाझीपूर सीमादेखील बंद केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of farmers ready to march towards delhi after discussion with government over msp fail prd
Show comments