जेरुसलेम, नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाझा पट्टीत इस्रायल बॉम्बवर्षांव करत असल्यामुळे तेथील भारतीयांनी आपली तातडीने सुटका केली जावी अशी मागणी केली आहे.
मूळच्या जम्मू व काश्मीरमधील लुबना नझीर शाबू यांनी माहिती दिली की, येथे आम्ही क्रूर युद्धाचा सामना करत आहोत. काही सेकंदांच्या कालावधीत बॉम्बहल्ल्यांमध्ये सर्व काही नष्ट झाले आहे. या संघर्षांची आम्ही किंमत मोजत आहोत, कारण आता नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.
हेही वाचा >>> बॉम्बवर्षांवाने गाझाची चाळण! इस्रायली हवाई दलाचा तीव्र प्रतिहल्ला
गाझा पट्टीमध्ये जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला असून चार हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये परदेशी नागरिक व पर्यटकांचाही समावेश आहे. गाझा पट्टीप्रमाणेच इस्रायलमध्येही परदेशी लोक अडकून पडले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यामध्ये २ रशियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे रशियाच्या इस्रायलमधील राजदूतांनी सांगितले. मात्र, त्यांनी त्यांची ओळख जाहीर केली नाही. तर इस्रायलमध्ये फ्रान्सचे चार नागरिक ठार झाले. इस्रायल आणि गाझा पट्टीतून आपापल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतीयांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी – विजयन
युद्धात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी अशी विनंती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना केली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये जवळपास सात हजार केरळमधील असून या युद्धामुळे त्यांचे कुटुंबीय अतिशय तणावात आहेत, असे विजयन यांनी सांगितले.
पॅलेस्टिनी निर्वासितांच्या इमारतीचे नुकसान
पॅलेस्टिनी निर्वासितांच्या राहण्याची सोय करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीचे बॉम्बहल्ल्यामध्ये नुकसान झाले. मात्र, त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या परदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच परिसरातील दुसऱ्या इमारतीमध्ये आसरा घेतल्याचे सांगण्यात आले.
इस्रायलचा गाझा पट्टीला वेढा बेकायदा -संयुक्त राष्ट्रे
जिनिव्हा : इस्रायलने गाझा पट्टीला वेढा घालणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदा असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे (यूएनएचआर) प्रमुख वोकर टर्क यांनी हमासने केलेल्या सामूहिक हत्याकांडाचाही निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सामान्य नागरिकांना ओलीस धरणे बेकायदा आहे असे ते म्हणाले.
इस्रायलला वाढता पाठिंबा
अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली यांच्यानंतर ब्रिटननेही हमासविरोधातील युद्धामध्ये इस्रायलला पाठिंबा दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली यांच्या नेत्यांशीही चर्चा केली. ब्रिटनमधील ज्यू समुदायाच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यासंबंधी एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले.
गाझामध्ये ७ पत्रकारांचा मृत्यू इस्रायलच्या हवाई
हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील सात पत्रकारांचा मृत्यू झाला. सरकारी माध्यम कार्यालयाने यासंबंधी माहिती दिली. त्याशिवाय १० पेक्षा जास्त पत्रकार जखमी झाले आहेत.
हल्ल्यामध्ये इराणचा हात नाही – फ्रान्स
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचा थेट हात असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मात्र, हमासला बाह्य मदत आणि सहकार्य मिळत असल्याचे दिसत आहे असे ते म्हणाले. इस्रायल-पॅलेस्टाइन वादामध्ये इराणमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी हमासने केलेल्या हल्ल्याची उघड प्रशंसा केली. त्यामुळे हल्ल्यासाठी इराणने हमासला मदत केली असावी अशी शंका व्यक्त केली जात होती.
गाझा पट्टीला रसद पुरवण्याची तयारी
इराकमधील शिया धर्मगुरू आणि राजकीय नेते मुक्तदा अल-सद्र यांनी नजफ शहरामध्ये मंगळवारी केलेल्या भाषणामध्ये ‘सर्व अरब बांधवांनी, विशेषत: इजिप्तच्या लोकांनी आपल्या सीमा खुल्या कराव्या आणि गाझा पट्टीला घातलेला अमानवी वेढा उठवण्यासाठी मदत करावी’ असे आवाहन केले. तसेच वेढा पडलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला रसद पाठवण्यासाठी इराक तयार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
रशियाची मध्यस्थीची तयारी
इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये मध्यस्थी करायची तयारी असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. दोन्ही पक्षांदरम्यान समझोता होण्यासाठी इस्रायल आणि पॅलेस्टिनी या दोघांशीही रशिया चर्चा करत असल्याचे पेस्कोव्ह यांनी सांगितले. पॅलेस्टाइनचे नेते महमूद अब्बास लवकरच रशियाला भेट देतील असा दावा पॅलेस्टाइनच्या राजदूतांनी केला आहे. त्याविषयी विचारले असता, ही भेट युद्धापूर्वीच ठरवली होती असे पेस्कोव्ह यांनी सांगितले. रशियाला हे युद्ध भडकावत ठेवण्यात रस आहे, हा युक्रेनचा दावा पेस्कोव्ह यांनी फेटाळून लावला.
गाझा पट्टीत वैद्यकीय सामग्रींची गरज
गाझा पट्टीमधील सात रुग्णालयांमध्ये असलेला वैद्यकीय सामग्रींचा साठा संपल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये पॅलेस्टिनी नागरिक मोठय़ा प्रमाणात जखमी होत असल्यामुळे वैद्यकीय सामग्रीची गरज वाढत असल्याचे डब्लूएचओकडून सांगण्यात आले.