जेरुसलेम : इस्रायलच्या लष्कराने जमीन, हवाई आणि समुद्रामार्गे गाझामध्ये कारवाई सुरू करण्यासाठी सज्ज असून केवळ आदेशाची वाट पाहात असल्याचे जाहीर केले आहे. तसेच गाझाच्या साधारणत: उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड गोंधळाची स्थिती असून जीव वाचविण्यासाठी नेमके जायचे कुठे, असा प्रश्न गाझामधील २३ लाख नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> वीज, इंधन, वैद्यकीय साहित्याचापुरवठा थांबल्यास हजारोंचा मृत्यू; ‘गाझा’तील रुग्णालयांचा इशारा
हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर गेला आठवडाभर इस्रायलची विमाने गाझा पट्टीवर अक्षरश: आग ओकत आहेत. गाझामध्ये सर्वत्र गोंधळाची स्थिती असतानाच रविवारी इस्रायलने गाझाचा उत्तरेकडील भाग रिकामा करण्याचे आदेश जारी केले. गाझाच्या उत्तर भागात हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यापूर्वी रहिवाशांना तेथून हलवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. गाझा शहरातील दहशतवाद्यांचे भूमिगत अड्डे नष्ट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याउलट, हमासने लोकांना त्यांच्या घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. सर्वसामान्य नागरिक मिळेल त्या वाहनाने दक्षिण गाझाच्या दिशेने निघाल्याचे चित्र असले तरी अनेक जण अद्याप अडकून पडले आहेत. पेट्रोल पंपांवर इंधन मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यातच आठवडाभरातील बॉम्बवर्षांवात जखमी झालेले शेकडो नागरिक रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांच्या स्थलांतराचा गंभीर प्रश्न आहे. मात्र इस्रायलने हमास संपविण्याचा विडा उचलल्यामुळे आता कोणत्याही क्षणी इस्रायलचे सैन्य गाझामध्ये शिरून जमिनीवरील कारवाई सुरू करण्याची शक्यता आहे.
युद्धभूमीवरील ताज्या घडामोडी
’नेतान्याहू यांच्या आणीबाणी सरकारची पहिली बैठक
’संयुक्त राष्ट्रांच्या गाझामधील छावणीमध्ये पाणीटंचाई
’अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथोनी ब्लिंकन पुन्हा इस्रायलला जाणार ’औषधे, वैद्यकीय साहित्याआभावी गाझातील रुग्णालयांत ‘आणीबाणी’