उत्तर भागातून रुग्ण हलवणे मृत्यूला आमंत्रण
एपी, गाझा पट्टी
इस्रायलच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जखमी झालेले रुग्ण गाझा पट्टीतील रुग्णालयांत मोठय़ा संख्येने भरती करण्यात आले आहेत. मात्र, इस्रायली लष्कराने येथे जमिनीवरून आक्रमण करून रसद तोडल्यास रुग्णालयातील वीज, इंधन, वैद्यकीय साहित्य, मूलभूत गरजांचा पुरवठा ठप्प होण्याची भीती आहे. त्या अभावी रुग्णालयातील हजारो जखमी रुग्ण मृत्युमुखी पडतील, असा इशारा गाझामधील रुग्णालयांतील डॉक्टरांनी संभाव्य इस्रायली लष्करी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिला.
हेही वाचा >>> लष्करी हालचालींना वेग; गाझातील रहिवाशांकडे तीन तासांचा वेळ, इस्रायलने दिली ‘डेडलाईन’
इस्रायली हल्ल्यापूर्वी येथील नागरिक अन्न, पाणी आणि सुरक्षित ठिकाणे शोधण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या आठवडय़ात हमासच्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इस्रायलने संपूर्ण गाझा परिसराला वेढा घातला आणि पॅलेस्टिनींना उत्तरेकडील भाग सोडून दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्र आणि येथील बचाव पथकांनी म्हटले आहे, की ४० किलोमीटरच्या या किनारपट्टीला इस्रायलने वेढा घालून संपूर्ण नाकेबंदी केली असताना येथून अल्पावधीत नागरिक स्थलांतर करू लागले तर गंभीर संकट निर्माण होईल.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे, की या रुग्णालयातील दोन हजारांहून अधिक रुग्णांना तेथून हलवणे त्यांच्यासाठी मृत्युदंडच ठरेल. या रुग्णालयांत नवजात अर्भकांचा समावेश आहे आणि गाझा पट्टीतील उत्तरेकडील रुग्णालयांत अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाझा येथील रुग्णालयांतील विद्युत जनित्रांचे इंधन दोन दिवसांत संपेल. त्यानंतर येथील हजारो रुग्णांचा जीव धोक्यात येईल. खान युनिसमधील नासिर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सध्या जखमी-अत्यवस्थ रुग्णांनी भरलेला आहे. यात बहुतेक तीन वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत.
हेही वाचा >>> Israel Hamas War : इस्रायलमध्ये घुसून नागरिकांची कत्तल करणारा हमासचा कमांडर ठार, दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त
‘क्रिटिकल केअर कॉम्प्लेक्स’चे सल्लागार डॉ मोहम्मद कंदील यांनी सांगितले, की या हल्ल्यांतील स्फोटात गंभीर जखमी झालेले शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. या रुग्णालयांतील इंधन सोमवापर्यंत संपेल, अशी भीती आहे. ते म्हणाले की, आयसीयूमध्ये ३५ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर (व्हेंटिलेटर) आहेत. आणखी ६० रुग्ण ‘डायलिसिस’वर आहेत. जर इंधन संपले तर ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प होईल. सर्व सेवा बंद पडतील.
पॅलेस्टाईनमध्ये २३००च्या वर मृत्युमुखी
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षांत आतापर्यंत दोन हजार ३२९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.‘गाझा’च्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. गाझापट्टीत आतापर्यंत झालेल्या पाच युद्धांपैकी हे सर्वात भीषण युद्ध ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यात २०१४ मध्ये झालेल्या युद्धात दोन हजार २५१ पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले होते. त्यापैकी एक हजार ४६२ सामान्य नागरिक होते. सध्या येथे चिघळलेल्या युद्धातील मृतांची संख्या रविवापर्यंत २०१४ च्या युद्धापेक्षा जास्त झाली आहे. २०१४ चे युद्ध सहा आठवडे चालले आणि इस्रायलच्या सहा नागरिकांसह ७४ जण मृत्युमुखी पडले होते. सुमारे आठवडाभरापूर्वी जेव्हा ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर अनपेक्षित हल्ला केल्यानंतर या युद्धाला तोंड फुटले आहे. ‘हमास’च्या या हल्ल्यात एक हजार ३०० हून अधिक इस्रायली मारले गेले आहेत, ज्यात मोठय़ा संख्येने सामान्य नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलसाठी हे १९७३ च्या इजिप्त आणि सीरियासोबतच्या युद्धानंतरचे सर्वात भीषण युद्ध ठरले आहे.
इस्रायलहून आणखी ४७१ भारतीय परतले
नवी दिल्ली : तेल अवीवमधून एकूण ४७१ भारतीयांना घेऊन दोन विमाने रविवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीत परतली. यातील एक विमान ‘एअर इंडिया’चे तर दुसरे विमान ‘स्पाइस जेट’चे होते. एकूण चार विमानांद्वारे ‘ऑपरेशन अजय’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमधून भारतात परतू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने ही मोहीम सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी सांगितले की, १९७ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले. त्यांनी ‘एक्स’ वर नमूद केले, की २७४ प्रवाशांना घेऊन चौथे विमानही दिल्लीला पोहोचले. या विमानातील प्रवाशांची छायाचित्रेही त्यांनी प्रसृत केली. ‘एअर इंडिया’ची दोन विमाने तेल अवीव येथून शुक्रवारी आणि शनिवारी एकूण ४३५ हून अधिक प्रवाशांना घेऊन परतली.