ओबामा यांची अमेरिकेला ग्वाही
आयसिसला नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा दिलासा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅलिफोर्नियातील हत्याकांडानंतर समस्त अमेरिकावासीयांना दिला आहे. आयसिस येथील व जगातील लोकांच्या मनात विष भरवित आहे पण दहशतवादाच्या या नव्या टप्प्यास अमेरिका समर्थपणे तोंड देईल असे ते म्हणाले.
व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयातून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ओबामा यांनी सांगितले की, दहशतवादाचा धोका आहे हे खरे आहे पण अमेरिका त्यावर मात करील. सीरिया व इराकमध्ये आयसिसला नेस्तनाबूत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सैन्य पाठवण्याची शक्यता नाही. आयसिसचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेने योजना तयार केली आहे त्याला अमेरिकी कमांडर्सचे पाठबळ आहे,
दहशतवादविरोधी तज्ज्ञांची मदत आहे. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी आघाडीत एकूण ६५ देश सहभागी आहेत. अमेरिकी शक्तीच्या पैलूचा प्रत्येक पैलू आयसिसविरोधात वापरला जाईल. आमचे यश केवळ कठोर बोलण्याशी निगडित नसेल. आम्ही आमची मूल्ये सोडणार नाही पण आयसिसने भीती पसरवण्याचे जे प्रयत्न चालवले आहेत त्यांना भीकही घालणार नाही. आयसिसला जे हवे आहे तसे मोठे युद्ध इराक किंवा सीरियात आमही करणार नाही, ते आम्हाला युद्धात पराभूत करू शकत नाहीत हे त्यांना माहिती आहे. आम्ही जर परदेशात असे हल्ले केले तर हजारो सैनिक मरतील. आमची आर्थिक साधने संपतील व दहशतवाद मूळ धरून राहील. विशेष पथकांच्या मदतीने हवाई हल्ले करण्याचे आमचे धोरण आहे. जे स्थानिक गट पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आम्ही मदत करीत आहोत.
आम्ही आमच्या सैनिकांना परदेशी भूमीत पाठवून मरू देणार नाही. आयसिसचा इस्लामशी काही संबंध नाही त्यामुळे इस्लामी नेत्यांनी या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा धिक्कार करावा. ज्या देशात शक्य असेल तिथे जाऊन अमेरिकी लष्कर या दहशतवादी कटकारस्थाने करणाऱ्यांचा शोध घेईल. गेल्या काही वर्षांत दहशतवादाचा धोका बदलत्या रूपात पुढे आला आहे. इराकमधील युद्धानंतर आयसिसचे प्राबल्य वाढले, आताच्या काळात सर्व देशातील भौगोलिक अंतर जास्त असले तरी संदेशवहनाने ते कमी झाले आहे त्यामुळे हे दहशतवादी विषारी विचारसरणी पसरवित आहेत. बोस्टन येथे मेरॅथॉनमध्ये झालेला स्फोट व सॅन बेरनार्डिनो येथे झालेले हत्याकांड ही त्याची उदाहरणे आहेत. तो हल्ला दहशतवादी कृत्यच होते. पाकिस्तानी नागरिक तशफीन मलिक व पाकिस्तानी अमेरिकन सय्यद रिझवान फारूक यांनी या हल्ल्यात चौदा जणांना ठार केले होते व त्यांना मूलतत्त्ववादाची शिकवण मिळालेली होती.