पीटीआय, बंगळूरु

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे शुक्रवारी सकाळी ६८ खासगी शाळांना त्यांच्या आवारात-परिसरात बॉम्ब असल्याचा इशारा देणारा ‘ई-मेल’ आला. हा ‘ई-मेल’ मिळाल्यानंतर शाळेतील कर्मचारी आणि पालकांमध्ये घबराट पसरली. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ शाळेच्या आवारातून बाहेर काढण्यात आले.  हा संदेश ‘ ‘‘kharijites@beeble.com’’ या ‘ईमेल आयडी’वरून आला आहे, अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी पत्रकारांना दिली.

पोलिसांनी सांगितले, की शाळेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर ते बॉम्ब निकामी पथक आणि तोडफोड नियंत्रण व तपास पथकासह संबंधित शाळांत पोहोचले. संध्याकाळपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्बची धमकी मिळालेल्या ६८ शाळांपैकी ४८ शाळा शहराच्या हद्दीत आहेत तर उर्वरित बंगळूरु ग्रामीण हद्दीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच कमालीची घबराट पसरली. आपापल्या मुलांना सुखरूप घरी आणण्यासाठी या पालकांनी शाळेत धाव घेतली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आतापर्यंत बंगळूरुमधील ६८ शाळांना बॉम्ब ठेवल्याबद्दल ईमेल मिळाले आहेत. बॉम्ब असल्याच्या या धमकीचा संदेश एकाच ‘ईमेल आयडी’वरून आला होता. शोध मोहीम जवळपास पूर्ण झाली आहे आणि आतापर्यंत आमच्या पथकाला कोणत्याही शाळेच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षीही काही समाजकंटकांनी बंगळूरुच्या शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा दावा करणारे असेच ‘ई मेल’ पाठवले होते, त्यानंतर या अफवा ठरल्या होत्या.

हेही वाचा >>>मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलली, निवडणूक आयोगानं दिलं ‘हे’ कारण

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अशी धमकी मिळालेल्या एका शाळेला भेट दिली. त्यांनी शाळा आणि पोलिसांकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले, की वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहिल्यानंतर मी थोडा काळजीत होतो. कारण यापैकी काही शाळा मला माहीत आहेत आणि त्या माझ्या घराजवळ आहेत, म्हणून मी परिस्थिती जाणून घेण्यासाठी बाहेर पडलो. पोलिसांनी मला हा ‘ई मेल’ दाखवला. प्रथमदर्शनी तो बनावट असल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या पालकांनी काळजी करण्याची गरज नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. काही विघ्नसंतोषी समाजकंटकांनी हे कृत्य केले असावे. आम्ही त्यांना २४ तासांत पकडू.

ई-मेल’ आणि त्याच्या स्त्रोताचा तातडीने आणि गांभीर्याने तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि मंदिरांना पुरेशा प्रमाणात सुरक्षा प्रदान केली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास न देता सतर्क राहून या मागील व्यक्तींचा शोध घेण्यास सांगितले आहे. – सिद्धरामय्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threat of placing bombs in 68 schools in bangalore amy
Show comments