पीटीआय, बंगळुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना धमकी देणारा ईमेल आल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली. २५ लाख डॉलर (सुमारे २०.७ कोटी रुपये) द्या अन्यथा राज्यामध्ये अनेक स्फोट घडवून आणू अशी धमकी ईमेल पाठवणाऱ्याने दिल्याचे त्यांनी सांगितले. हे ईमेल पोलिसांना अग्रेषित करण्यात आले असून ते पुढील तपास करत असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर हे ईमेल पाठवण्यात आले आहे.
‘‘मला आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तीन दिवसांपूर्वी हे ईमेल आले. ते माझ्या फोनमध्ये आहे आणि मी ते तपासासाठी पोलिसांना पाठवले आहे’’, असे शिवकुमार म्हणाले. ‘शाहिद खान१०७८६’ असे ईमेल पाठवणाऱ्याचे ‘युजरनेम’ आहे. पुढील संभाषणासाठी त्याने आणखी एक ईमेल आयडीही दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली. हे ईमेल बनावट, फसवे, खरे, खोटे किंवा खंडणीसाठी धमकी देणारे आहे हे आम्हाला माहित नाही असे शिवकुमार म्हणाले.
हेही वाचा >>>“राहुलयान १९ वेळा फेल झाल्यामुळे…”, अमित शाहांचा राहुल आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल
‘‘सावधान १ – तुम्ही आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. जर तुम्ही आम्हाला २५ लख डॉलर दिले नाहीत तर आम्ही संपूर्ण कर्नाटकात बस, रेल्वे, टॅक्सी, मंदिरे, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी मोठे स्फोट घडवू’’. ‘‘सावधान २ – आम्ही तुम्हाला आणखी एक ट्रेलर दाखवतो. आम्ही पुढील स्फोट अंबारी उत्सव बसमध्ये घडवू. बसमधील स्फोटानंतर आम्ही समाजमाध्यमावर आमची मागणी उपस्थित करू आणि तुम्हाला पाठवलेल्या ईमेलचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमावर सामायिक करू. पुढील स्फोटाबद्दल आम्ही समाजमाध्यमावर ट्विट करू’’, असा मजकूर या ईमेलमध्ये लिहिलेला आहे.