China-US Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील ७० देशांवर समन्यायी आयातशुल्क लादले होते. मात्र त्यावर गदारोळ निर्माण झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. मात्र चीनवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवून व्यापारयुद्ध अधिक तीव्र केले. बुधवारी तातडीने ही शुल्कवाढ केल्यानंतर आता चीनकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गुरूवारी चीनच्या वाणिज्य मंत्र्यांनी वॉशिंग्टनशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे जाहीर केले. मात्र त्याआधी एकमेकांचा आदर राखत समान वागणूक द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते हे योंगकियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, धमक्या आणि ब्लॅकमेल ही चीनशी व्यवहार करण्याची योग्य पद्धत होणार नाही.

चीन-अमेरिका व्यापार युद्ध

डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चीनसह सर्व देशांवर आयातशुल्क लादल्यानंतर चीनकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. चीनने अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादल्याची घोषणा केली होती. त्यामुळेच बुधवारी अमेरिकेने बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला स्थगिती दिल्यानंतर चीनवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढविला.

३ एप्रिल रोजी अमेरिकेने चीनवर ३४ टक्के आयातशुल्क लादले होते. दुसऱ्या दिवशी चीननेही अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. चीनच्या या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. चीनचा हा निर्णय चुकीचा असल्याचे ते म्हणाले. ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल नेटवर्किंग साईटवर लिहिले की, चीनने मोठी चूक केली आहे. ते बिथरले असून ही चूक त्यांना परवडणारी नाही.

त्यानंतर या आठवड्यात मंगळवारी अमेरिकेने चीनवर १०४ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लावले. अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेनंतर चीननेही त्याला जशास तसे उत्तर देत अमेरिकेच्या मालावरील आयातशुल्क ३४ टक्क्यांहून वाढवत ८४ टक्के केले. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू झाली.

दोन्ही देशांतील व्यापार किती?

गेल्या वर्षी दोन्ही देशांत मिळून एकूण ५८५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. पण यात अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीचे मूल्य १४५ अब्ज डॉलर इतके आहे. याउलट चीनकडून अमेरिकेला होणारीचे निर्यातीचे मूल्य ४४० अब्ज डॉलर इतके आहे. म्हणजे २९५ अब्ज डॉलरचे आधिक्य (सरप्लस) चीनकडे आहे. तितकीच तूट (डेफिसिट) अमेरिकेकडे आहे.