भोपाळ, पीटीआय
भोपाळ: विरोधी इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यात गुंतले असून, देशाचा विकास रोखण्यासाठी धमकावत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
मध्य प्रदेशातील बालघाट जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. आगामी लोकसभा निवडणूक ही नव्या भारताच्या जडणघणीसाठी महत्त्वाची आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान जेव्हा हमी देतात तेव्हा विरोधक संतप्त होतात. विकास आणखी वेगाने व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?
विरोधकांकडून रामाचा अपमान
पिलिभीत: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम रोखण्याचे काँग्रेसने अनेक प्रयत्न केले. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाचे निमंत्रण नाकारून त्यांनी रामाचा अपमान केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला. जनतेने दिलेल्या मदतीतून भव्य राम मंदिर उभे राहिले तेव्हा काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण तर धुडकावलेच पण पक्षातील जी मंडळी समारंभाला उपस्थित राहिली त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. राम मंदिर उभारणीत दिवंगत मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या योगदानाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. काँग्रेस तुष्टीकरणाच्या राजकारणातून बाहेर येऊ शकत नाही. काँग्रेसचा जाहीरनामा पाहता, तो मुस्लीम लीगचा आहे काय? असे वाटते असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
काँग्रेस सरकारच्या काळात जगातून मदत मिळावी म्हणून आवाहन केले जायचे. करोनाकाळात जगासाठी भारताने औषधे उपलब्ध करून दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. देश बलवान होते तेव्हा जगाकडून दखल घेतली जाते ते पंतप्रधानांनी नमूद केले.