जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनना दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काही दहशतवादी आले आहेत अशी सूचना मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं.
लष्करी जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दहशतवादी विरुद्ध लष्कराचे जवान अशी चकमक सुरु झाली. या चकमकीत लष्कराचे तीन जवान हे गोळ्या लागून जखमी झाले. त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं पण तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी जेव्हा जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली त्याचवेळी ही घटना घडली.
या घटनेबाबत भारतीय लष्कराने ट्विट केलं आहे. कुलगाम येथील हलच्या उंच डोंगरावर दहशतवादी लपले आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरु केली. मात्र दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यांना उत्तर देत असताना लष्कराचे तीन जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र सर्च ऑपरेशन सुरु आहे असंही ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
याआधी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पूँछ आणि राजौरी या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या चकमीत दहा जवान शहीद झाले. या वर्षाच्या सुरुवातीलाच राजौरी या ठिकाणी दहशतवाद्यांनी काही हिंदू कुटुंबांवर हल्ला केला. या घटनेत सात निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे या भागात जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. सीमेपलिकडून हे अतिरेकी येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जवानांकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.