सोयूझ अंतराळ कुपी आज यशस्वीरीत्या अंतराळ स्थानकाला जोडली गेली असून तीन अंतराळवीर तेथे पोहोचले आहेत. त्यामुळे स्थानकातील एकूण अंतराळवीरांची संख्या आता सहा झाली आहे. अमेरिकेचे ख्रिस कॅसिडी , रशियाचे पावेल विनोग्रॅडोव्ह व अ‍ॅलेक्झांडर पावेल यांनी सहा तास अंतराळ कुपीतून प्रवास करून अंतराळ स्थानक गाठले.
आम्हाला बाहेरचे दृश्य अतिशय सुंदर दिसत आहे असे अंतराळवीर विनोग्राडोव यांनी नासा टीव्हीला सांगितले. ते १९९७ व २००६ असे दोनदा अंतराळ स्थानकात जाऊन आले आहेत. आता अंतराळात गेलेले तिघे जण हे पाच महिने अंतराळ स्थानकात वास्तव्य करणार आहेत. कुपी अंतराळस्थानकात गेली तेव्हा घरात कुणी आहे का? विनोग्राडोव यांनी गमतीने विचारले. कॅसिडी, विनोग्राडोव व मिसुरकिन यांचे अमेरिकेचे टॉम मॅशनबर्न, रशियाचे रोमन रोमानेन्को व कॅनडाचे ख्रिस हॅडफील्ड यांनी स्वागत केले. हे तिघे डिसेंबरपासून अवकाशात आहेत. आता गेलेल्या अंतराळवीरांनी नंतर मॉस्को बाहेर असलेल्या नियंत्रण कक्षाशी हितगुज केले, ते मित्र व नातेवाईक यांच्याशी बोलले. तू तर आता खरोखर स्टार झाला आहेस असे मिसरूकीनची आई सद्गदित होऊन म्हणाली. त्याची ही पहिलीच अंतराळवारी आहे. रात्री उशिरा कझाकस्थानच्या बैकानूर अवकाश तळावरून सोयूझचे उड्डाण झाले. यावेळी प्रथमच थेट मार्गाने ते अंतराळस्थानकापर्यंत पोहोचले. केवळ चार प्रदक्षिणांनंतर ते अंतराळ स्थानकात पोहोचले. एरवी ५० तासांच्या प्रदक्षिणेनंतर अंतराळ स्थानकात जाता येते. हा एक नवीनच प्रयत्न असून त्याची चाचणी रशियाच्या प्रोग्रेस कार्गोशिप म्हणजेच सोयूझच्या निर्मनुष्य कुप्यांमध्ये करण्यात आली होती. विनोग्राडोव यांनी उड्डाणापूर्वी  सांगितले की, कमी अंतराच्या उड्डाणामुळे अंतराळवीरांचा थकवा कमी होणार आहे.

Story img Loader