बिहारच्या मुझ्झफरपूर येथून घरातून पळून गेलेल्या तीन मुलींचे मृतदेह मुथेरीतील बजना पूलाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आले आहेत. तीनही मुलींच्या पालकांनी या आपल्याच मुली असल्याची ओळखही पटवली आहे. गौरी कुमारी (१४), मोहिनी कुमारी (१४) आणि माया कुमारी (१३) या तीनही मुली इयत्ता नववीत शिकत होत्या. तिघींची घट्ट मैत्री होती. काही दिवसांपूर्वी या तिघींनी घरातून पळ काढला होता. आम्ही आध्यात्माच्या शोधात हिमालयात जात आहोत, अशी चिठ्ठी मुलींनी लिहून ठेवली होती.
गौरी कुमारीचे वडील अमित यांनी सांगितले की, १३ मे रोजी मुलींनी घर सोडले होते. यावेळी त्यांनी घरी सोडलेल्या चिठ्ठीत लिहिले, “बाबाने आम्हाला बोलावले आहे. त्यामुळे आम्ही आध्यात्माच्या शोधात हिमालयात निघालो आहोत. आता तीन महिन्यांनी १३ ऑगस्ट रोजी आम्ही घरी परतू.” आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या करू, अशी धमकीही चिठ्ठीद्वारे मुलींनी दिली होती.
गौरीच्या आईने सांगितले की, जेव्हा गौरी घराबाहेर पडली तेव्हा तिच्या हातावर मेहंदी नव्हती. मात्र तिचा मृतदेह पाहिला असता हातावर मेहंदी असल्याचे दिसले. तसेच मैत्रिणींनीही मेहंदी काढली असल्याचे दिसले. या तीनही मुलींचे फोनही गहाळ झालेले आहेत. बिहार पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा दाखविला असा आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे. १३ मे रोजी मुली बेपत्ता झाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली, पण पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. जेव्हा वरिष्ठांनी सूचना दिल्या, तेव्हाच पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.
मुझ्झफरपूरच्या शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कुमार यांनी मात्र सदर आरोप फेटाळले. त्यांनी म्हटले की, तक्रार मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची दखल घेत गुन्हा दाखल केला होता. मुलींनी स्वेच्छेने घर सोडले होते, त्याचे कारणीही त्यांनी पत्रात नमूद केले होते. आम्ही मुलींचा शोध घेत होतो, जेव्हा त्यांचे मृतदेह आढळून आले, तेव्हा आम्ही कुटुंबियांना याची माहिती दिली.
दुसरीकडे मथुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविले आहेत. तर मुझ्झफरपूर पोलिसांनीही या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.