ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान व एक नागरिक  असे चार जण मृत्युमुखी पडले. सीमा सुरक्षा दलाच्या १०४ व्या बटालियनचे जे गस्ती पथक होते ते जानबाय येथे असताना सकाळी साडेसात वाजता सुरूंगाचा स्फोट झाला, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा भ्याड हल्ला समर्थनीय असू शकत नाही, असे म्हटले आहे.
हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांत सहायक उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे, तर सहायक कमांडंट अशोक कुमार व इतर सहा जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक नागरिकही या हल्ल्यात ठार झाला आहे. सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ कमांडर घटनास्थळी गेले आहेत. जो अधिकारी जखमी झाला त्याने डोळा गमावला आहे. जखमींना मलकानगिरी येथील सरकारी रूग्णालयात दाखल केले आहे. सीमा सुरक्षा दलाची जादा कुमक पाठवण्यात आली असून हल्ला झाला तेव्हा सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत होते.
सीमा सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या तळापासून चिंतमडोली घाटाकडे बोटीने गेले होते, त्यानंतर हा स्फोट झाला असे चित्रकोंडाचे पोलिस निरीक्षक पिताबस धारूआ यांनी सांगितले. घाटावर सुरूंगाचा स्फोट होताच माओवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला, त्यात सहा जवान जखमी झाले असे मलकानगिरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक आर.के.दास यांनी सांगितले. तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. मलकानगिरीचे पोलीस अधीक्षक मित्रभानू मोहापात्रा यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व नंतर परिस्थितीचा आढावाही घेतला.

Story img Loader