भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या अट्टारी-वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाले. नेहमीच्या गस्तीवर असताना त्यांच्या वाहनावर गोळीबार झाला, त्यात हे जवान जखमी झाले. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या १६३व्या बटालियनचे जवान टाटा ४०७ वाहनातून गस्त घालण्यासाठी बाहेर पडले असता भिकीविंड छावणीनजीक त्यांच्यावर गोळीबार झाला.
गोळीबाराची माहिती देताना सीमासुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक आरपीएस जस्वाल यांनी सांगितले, की जवान नेहमीच्या गस्तीवर असताना पाकिस्तानी तस्करांनी गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात तीन जवान जखमी झाले. सीमा सुरक्षा दलानेही पाकिस्तानी तस्करांवर गोळीबार करून प्रत्युत्तर दिले.  
गोळीबाराच्या वेळी सीमा सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले व त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ट्रकचालकाला मांडीस गंभीर इजा झाली आहे. उपमहानिरीक्षकांनी सांगितले, की पाकिस्तानी तस्करांकडे एके ४७ रायफली होत्या. काही भारतीय तस्करही या वेळी सामील होते. सीमा सुरक्षा दलाने त्यांचा शोध घेण्याचे काम चालवले आहे.

Story img Loader