नवी दिल्ली : हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर, बुधवारी भाजपकडून सरकार वाचविण्यासाठी खटपट सुरू झाली असून काँग्रेसनेही डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांतील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला, तर काँग्रेस सरकार बनवणार असेल तर पाठिंबा देऊ, असे जननायक जनता पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौताला यांनी जाहीर केले.
हरियाणामध्ये २५ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असताना राज्यात राजकीय साठमारी सुरू झाली आहे. अपक्ष आमदार सोम्बिर संगवान, रणधीरसिंह गोलन आणि धर्मपाल गोंदर यांनी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी सरकारचा पाठिंबा मंगळवारी काढल्याने सरकार अल्पमतात आल्याचा दावा काँग्रेसने केला असून राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. खट्टर सरकारमध्ये भाजपबरोबर असलेल्या चौताला यांनीही सैनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आम्ही पाठिंबा देऊ, आता काँग्रेसने निर्णय घ्यावा, असे चौताला म्हणाले. हरियाणाच्या ९० सदस्यांच्या विधानसभेमध्ये दोन सदस्य लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांनी राजीनामा दिल्याने ८८ सदस्य राहिले आहेत. बहुमताचा आकडा ४५ आहे. भाजपकडे ४० आमदार असून अन्य दोन अपक्ष व हरियाणा लोकहित पक्षाचे गोपाल कांडा यांचा पाठिंबा असल्याने ४३ संख्याबळ आहे.
काँग्रेसकडे ३० आमदार असून बहुमतासाठी आणखी १५ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. जननायक जनता पक्षाचे १० आमदार असून तीन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला यांचाही काँग्रेसला पाठिंबा मिळू शकतो.