राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अजित पवार गटाने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला असून त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
आज कोणत्या प्रकरणी सुनावणी?
अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश देण्याची मागणी जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. तर, आमदार अपात्रतेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून विलंब असल्याची तक्रार घेऊन ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या दोन्ही याचिकावंर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी घेतला आहे. डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले?
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्याआधीच अजित पवार गटाकडून अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले की, “जयंत पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की अजित पवार गटाच्या आमदार अपात्र प्रकरण नार्वेकरांकडे असून त्यावर लवकरात लवकर सुनावणी घण्याचे निर्देश द्या. कारण आमदार अपात्रता फक्त विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरच ठरवू शकतात. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.”
सिद्धार्थ शिंदे पुढे म्हणाले की, “अजित पवार गटाने तीन हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. या याचिका ज्यांनी दाखल केल्या आहेत, त्यांची नावे महत्त्वाची आहेत. अनिल पाटील (प्रतोद), नरहरी झिरवळ (विधानसभा उपाध्यक्ष), छगन भुजबळ या तिघांच्या याचिका दाखल झाल्या आहेत. या तिघांनी याचिका का केल्या तर त्यांचे वकील बाजू मांडू शकतील. त्यांचं असं म्हणणं असेल की आमदार अपात्रतेप्रकरणी घाई करण्याची गरज नाही, निवडणूक आयोगासमोर प्रकरण सुरू आहे आणि अध्यक्षांसमोर महिन्याभरापूर्वी याचिका सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत याचिका क्लब (एकत्रित) करू नका, आमचं वेगळं प्रकरण ठेवा, असाच त्याचा अर्थ आहे.”
“आजच्या सुनावणीत या हस्तक्षेप याचिकांवर चर्चा होईल. या याचिका सुनावणीत घ्यायच्या की नाही त्यावर कोर्ट आज ठरवेल”, असंही ते म्हणाले. “याचिका एकत्रित केल्याने दादा गटाला त्यांचे मुद्दे ठेवायला संधी मिळते. अजित पवार येथे आलेले नाहीत, परंतु, त्यांचे तीन लोक येथे आले आहेत, त्यामुळे त्यांचंही म्हणणं ऐकून घ्या असं त्यांना दाखवायचं आहे”, असं शिंदे म्हणाले.