पूर्व दिल्लीतील खुरेजी परिसरातील एका बेकरीत स्फोट झाल्याने तीन कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. प्रथमदशर्नी हा बेकरीतील ओव्हनचा स्फोट झाला असण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. स्फोट झाला त्यावेळी बेकरीत सुमारे २० कामगार काम करत होते. जखमींवर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दिल्लीतील खुरेजी परिसरातील बेकरीत पहाटे ५.३०च्या सुमारास २० कामगार काम करत असताना अचानक हा स्फोट झाला. स्फोट झाला त्या वेळी बेकरीतील किचनजवळ पाच कामगार काम करत होते. स्फोटामुळे बेकरीत आग लागल्याने यात तिघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरीत जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा बेकरीतील ओव्हनचा स्फोट होता की इतर कारणांमुळे हा स्फोट झाला याचा शोध घेण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
काही दिवसांपूर्वीच नाशिक येथील कॉलेज रोडवरील एका बेकरीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामुळे बेकरीच्या शेजारील दुकानांचेही मोठे नुकसान झाले होते.