three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed : पंजाबच्या सीमावर्ती भागात पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्या प्रकरणात कथित सहभाग असलेले तीन खलिस्तान जिंदाबाद फोर्स(KZF) चे सदस्य उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. ही कारवाई पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलीस एकत्रितपणे या कारवाईत सहभागी झाले होते.
पंजाब पोलिसांनी सकाळी आरोपींना अटक केल्याची माहिती दिली होती. मात्र नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्पष्ट केले. मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटली असून गुरूविंदर सिंग (२५), विरेंद्र सिंग उर्फ रवी (२३)आणि जसन प्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग (१८) अशी तिघांची नावे असून हे सर्व गुरुदासपूर येथील रहिवासी आहेत.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, “पाक-समर्थित खलिस्तान जिंदाबाद फोर्स दहशतवादी मॉड्यूलविरोधात मोठे यश मिळाले आहे. यूपी पोलीस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान तीन मॉड्यूल सदस्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर चकमक झाली. यादरम्यान जखमींना तात्काळ सीएचसी पुरानपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात. या संपूर्ण टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी तपास सुरू आहे”. दरम्यान पोलिसांनी या तिघांकडून दोन एके-४७ रायफली आणि दोन ग्लॉक पिस्तूले देखील जप्त केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार त्या तरूणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन पोलीस हवालदार सुमित राठी आणि शेहनवाज हे दोघे या चकमकीत जखमी झाल आहेत. पोलिसांनी सांगितले की, समोरासमोर आल्यानंतर त्या तिघांनी पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन संशयित जखमी झाले. नंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी एका निवेदनात गुरदासपूर येथील पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात तिघांचा सहभाग असल्याची पुष्टी केली आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधित कायद्या अंतर्गत केटीएफला दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. १ जुलै २०२० केंद्र सरकारने केटीएफ प्रमुख हरदीप सिंग निज्जर आणि इतर आठ जणांना परदेशातून भारत विरोधी मोहिमा राबवल्याबद्दल तसेच शीख तरूणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी हेण्यास प्रवृत्त केल्याबद्दल दहशतवादी घोषित केले. निज्जर याची कॅनडामध्ये जून २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती.